टिपेश्वर अभयारण्यात लाखोंचे सागवान बेवारस
By Admin | Updated: May 17, 2017 00:56 IST2017-05-17T00:56:38+5:302017-05-17T00:56:38+5:30
आग लागल्याने टिपेश्वर अभयारण्यातील सागवानाची मोठमोठी आणि परिपक्व झाडे जमिनदोस्त झाली.

टिपेश्वर अभयारण्यात लाखोंचे सागवान बेवारस
महिना लोटला : १५ लाखांच्या वनसंपत्तीला पाय फुटण्याची भीती
अब्दुल मतीन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : आग लागल्याने टिपेश्वर अभयारण्यातील सागवानाची मोठमोठी आणि परिपक्व झाडे जमिनदोस्त झाली. यावरून महिना लोटला, मात्र संबंधित विभागाकडून विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. सुमारे १५ लाख रुपयांच्या या संपत्तीला पाय फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टिपेश्वर अभयारण्यातील सावरगाव-रामनगर जंगलाला आग लागली होती. यामध्ये सागवानाची शंभरावर झाडे जळून कोसळली. ही झाडे केवळ बुंद्याजवळ जळाली असल्याने उर्वरित संपूर्ण भाग पूर्णपणे उपयोगाचा आहे. मात्र ही झाडे अजून तरी संबंधितांनी विल्हेवाट लावण्याच्यादृष्टीने उचललेली नाही.
१० ते १२ एकर क्षेत्रातील सागवान जळत असताना टिपेश्वर अभयारण्याशी संबंधित अधिकारी, कर्मचारी काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच पडून असलेल्या वृक्षांची योग्य विल्हेवाट लावण्यात विलंब का होत आहे, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. वास्तविक पंचनामा करून ही झाडे सुरक्षित ठिकाणी पोहोचविणे अपेक्षित होते. परंतु यावरून दिवसच लोटत चालले आहे. आणखी काही दिवस हिच परिस्थिती राहिल्यास तस्करांची नजर पडल्यास नवल वाटणार नाही.
रस्त्यावरील झाडांना आग
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावरील झाडांना आगी लावण्याचे प्रकार पारवा परिसरात वाढले आहे. मोठमोठी झाडे जाळून पाडली जात आहेत. त्याचा उपयोग केवळ जलतनासाठी केला जात आहे. शिवाय शेतधुऱ्यावर असलेली झाडेही शेतकऱ्यांकडून कापली जात आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होण्याची भीती आहे. वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र अस्तित्वात असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालविण्यासोबतच जाळली जात आहे.