सखी सन्मान पुरस्कार प्रस्तावांचे ज्युरीज मंडळाकडून परीक्षण
By Admin | Updated: October 22, 2016 01:37 IST2016-10-22T01:37:23+5:302016-10-22T01:37:23+5:30
लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित सखी सन्मान पुरस्कारासाठी आमंत्रित प्रस्तावांचे विविध क्षेत्रातील नामवंत ज्युरीजने परीक्षण केले

सखी सन्मान पुरस्कार प्रस्तावांचे ज्युरीज मंडळाकडून परीक्षण
यवतमाळ : लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित सखी सन्मान पुरस्कारासाठी आमंत्रित प्रस्तावांचे विविध क्षेत्रातील नामवंत ज्युरीजने परीक्षण केले. या प्रस्तावातून विविध गटातील कर्तृत्ववान महिलांची निवड करण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत महिलांचे प्रस्ताव एका पेक्षा एक सरस होते. तब्बल १८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावाचे परीक्षण अमोलकचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शंकरराव सांगळे आणि यवतमाळच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी केले. ग्रामीण भागात शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेणाऱ्या महिलांचे कर्तृत्व पुढे आले.
जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी क्रीडा गटासाठी प्रस्ताव पाठविले होते. या प्रस्तावांचे परीक्षण अभ्यंकर कन्या शाळेचे क्रीडा शिक्षक आणि खो-खोचे वरिष्ठ प्रशिक्षक अविनाश जोशी आणि यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव आणि कराटेचे नामवंत प्रशिक्षक आनंद भुसारी यांनी केले. व्यावसायिक-औद्योगिक क्षेत्रातही महिला कुठे मागे नसल्याचे प्राप्त झालेल्या प्रस्तावावरून दिसून आले. या प्रस्तावांचे परीक्षण यवतमाळ येथील उद्योजक आणि रासुरा तेलाचे निर्माते अशोक बन्सोड यांनी केले. आरोग्य या विषयात शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत महिलांचे अनेक प्रस्ताव प्राप्त झाले. या प्रस्तावांचे परीक्षण यवतमाळातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक आणि समाजसेवी डॉ. विजय कावलकर आणि प्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉ. आशिष तावडे यांनी केले. शौर्य या गटासाठी विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या महिलांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावातून यवतमाळ जिल्ह्यातील महिला कुठेही कमी नाही, हेच दिसून आले. या प्रस्तावांचे परीक्षण यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी केले.
जीवनगौरव पुरस्कारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील एका सेवाव्रती महिलेची निवड करण्याचे दिव्यही या ज्युरीज मंडळाला पार पाडावे लागले. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा अशा क्षेत्रात असामान्य ते सामान्य प्रवास करणाऱ्या महिलेची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करणे तेवढे सोपे काम नव्हते. परंतु हे काम ज्युरीज मंडळाने लिलया पार पाडले.
निवडलेल्या पुरस्कार प्राप्त महिलांचा गौरव २३ आॅक्टोबर रोजी मेळघाटात आंतरिक तळमळीतून वैद्यकीय सेवा देणारे डॉ. रवींद्र व डॉ. स्मीता कोल्हे, महिला अत्याचार आणि समस्यांविरुद्ध लढा उभारणाऱ्या अमरावतीच्या रजिया सुलताना आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला यवतमाळ जिल्ह्यातील सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे.
(नगर प्रतिनिधी)