विधान परिषद निवडणूक : एकजुटीवर विजय अवलंबून, नाचक्कीची भीतीयवतमाळ : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची गणित हे नेते मंडळींच्या एकजुटीवर अवलंबून आहे. या निवडणुकीत दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा असताना काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे खंदे समर्थक असलेल्या शंकर बडे यांना काँग्रेसने रिंगणात उतरविले. बडे यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदाराला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या मतदारांची गेल्या कित्येक वर्षांची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. या मतदारांना आता केवळ विजयाची मोहर उमटवावी लागणार आहे. पैसा महत्वाचा की आपल्यातीलच उमेदवार महत्वाचा याचा या मतदारांना सद्सद्विवेक बुद्धीने विचार करावा लागणार आहे. शंकर बडे गेली कित्येक वर्ष नगराध्यक्ष, नगरसेवक म्हणून काम करीत आहे. त्यांचा या क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. अध्यात्माकडील कल, नम्रता, चांगली प्रतिमा या बडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. बडे यांच्या विजयश्रीत काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी अडसर ठरू नये, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना आहे. ठाकरे-कासावारांकडून अधिक अपेक्षाजिल्ह्यात काँग्रेसची दिग्गज नेते मंडळी आहे. त्यांनी अनेक वर्ष मंत्री, आमदार या पदांवर कामे केली आहेत. त्यामुळे सत्तेचा दीर्घ अनुभव असलेल्या या नेत्यांची प्रतिष्ठा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे. त्यातही माणिकराव ठाकरे आणि वामनराव कासावार यांच्याकडून उमेदवाराला अधिक अपेक्षा आहेत. कारण राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असूनही विधान परिषद उपसभापती पदाच्या निमित्ताने माणिकराव ठाकरेंकडे लालदिवा आहे. वामनराव कासावार यांच्याकडेही प्रतिष्ठेचे मानले जाणारे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पद आहे. त्यांच्या विरोधात पक्षातूनच नांदेड-मुंबई-दिल्लीपर्यंत मोर्चेबांधणी करूनही त्यांचे जिल्हाध्यक्षपद कायम राहिल्याने त्यांचे प्रदेशस्तरावर असलेले वजन स्पष्ट होते. त्यामुळे ठाकरे व कासावार यांच्यावरच विजयाचे गणित अधिक अवलंबून राहणार आहे. काँग्रेसकडे आपल्या हक्काचे १५५ मतदार आहेत. याशिवाय २२० प्लस होतील, अशी आकडेवारी जुळविण्यात काँग्रेसचे उमेदवार यशस्वी झाल्याची माहिती आहे. त्यांना पक्षातून संपूर्ण समर्थन मिळणे तेवढे महत्वाचे आहे. विधान परिषद जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी प्रचंड उफाळून आली होती. सध्या त्याबाबत शांतता दिसत असली तरी ती वादळापूर्वीची तर नसेल ना अशी हूरहूर काँग्रेसच्या गोटातच व्यक्त होत आहे. काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांच्या विजयाचे गणित पूर्णत: नेत्यांच्या एकजुटीवर अवलंबून आहे. त्यातील एक-दोघांनीही दगा दिल्यास निकाल काँग्रेसच्या विरोधात जाण्यास वेळ लागणार नाही, एवढे निश्चित. त्यामुळेच प्रमुख पदावर असलेल्या दोन नेत्यांसह इतरांनाही एकसंघ ठेवण्याचे प्रयत्न स्वत: उमेदवाराकडून सुरू आहे. सर्वाधिक मतदार असल्याचा दावा करून उमेदवारी खेचून आणलेल्या काँग्रेस नेत्यांना आता आपला उमेदवार विजयी करणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. अन्यथा या नेत्यांची राजकीय क्षेत्रात आणि विशेषत: मुंबई-दिल्लीत पक्षश्रेष्ठींपुढे नाच्चकी होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची कसोटी
By admin | Updated: November 11, 2016 02:03 IST