भेदरलेल्या नजरेत वाघाची दहशत

By Admin | Updated: November 5, 2016 00:38 IST2016-11-05T00:38:59+5:302016-11-05T00:38:59+5:30

वाघ दिसला, शिवारात आला, जनावरे मारली, अमक्याला ठार मारले, या चर्चा परिसरातील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवित आहे.

Terror in Terror | भेदरलेल्या नजरेत वाघाची दहशत

भेदरलेल्या नजरेत वाघाची दहशत

शेती कामांना मिळाला अर्धविराम : राळेगावात गुराख्यांनीही सोडली जंगलाची वाट
अशोक पिंपरे  राळेगाव
वाघ दिसला, शिवारात आला, जनावरे मारली, अमक्याला ठार मारले, या चर्चा परिसरातील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवित आहे. नरभक्षक वाघाने तालुक्याच्या जवळपास २० गावांमध्ये दहशत निर्माण केली आहे. दररोज कुठली तरी वार्ता कानावर पडते आहे. गावशिवारात असलेल्या शेतातील कामे अर्धवट राहात आहे. गुराख्यांनी तर जंगलाची वाट सोडून दिली आहे. गावकऱ्यांच्या भेदरलेल्या नजरांमध्ये वाघाची दहशत स्पष्टपणे दिसून येत आहे. वाघाचा बंदोबस्त कधी करणार हा त्यांचा प्रश्न आहे.
तालुक्याच्या जंगलपट्ट्यातील सराटी, बोराटी, खैरगाव, तेजनी, वरूड, लोणी बंदर, पिंपळखुटी, कोळवण, सोयटी, झरगड, वरध, सावरखेडा, झोटिंगदरा, मजरा, निंबगव्हाण आदी गावे वाघाच्या दहशतीत आहे. बोराटी येथील सोनाबाई वामन घोसले, झोटिंगदरा येथील सखाराम लक्ष्मण टेकाम, खैरगाव(कासार) येथील मारोती विठोबा नागोसे आणि तेजनी येथील प्रवीण पुंडलिक सोनवणे हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, गुराखी यापैकी कुणीही कामावर जाण्यास धजावत नाही.
शेतात कापूस, तूर पीक काढणीला आले आहे. पण, कुणीही यासाठी तयार होत नाही. तालुक्यातील रस्ते अंधार होण्यापूर्वीच सामसूम होतात. एरवी रात्री उशिरापर्यंत दुचाकीने प्रवास करणाऱ्यांचीही संख्या नगण्य आहे. काही शेतकरी शेतात जाण्याचा प्रयत्न करतात. स्वसंरक्षणासाठी सोबत कुऱ्हाड नेतात. मात्र वनविभागाचे कर्मचारी हिसकावून घेतात, असा आरोप आहे. लक्ष्मण दुधकोहळे, रामभाऊ काळसर्पे यांनी ही समस्या मांडली.
दरम्यान, आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, वनसंरक्षक विजय हिंगे यांनी वाघाचा बळी ठरलेल्या तेजनी यैथील प्रवीण सोनवणे याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी या गावातील नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. वाघाचा बंदोबस्त करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा गावकऱ्यांनी दिला. सोबतच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीविषयीसुद्धा तक्रार केली.
आमदार डॉ. उईके गावात पोहोचताच संपूर्ण गाव रस्त्यावर आले. प्रसंगी सुधाकर जुनघरे, जयवंत हिवरकर, झित्रू ठाकरे, यादव कोटनाके, मधुकर बहाळे, अवी डंभारे, लक्ष्मण दुधकोहळे यांनी शेतकरी शेतमजुरांना संरक्षण देण्याची मागणी केली. त्याचवेळी आमदारांनी वाघाची शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

वनविभागाकडून उपाययोजना
परिसरातील दहा गावातील दहा स्वयंसेवक निवडून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ते जंगलाचा अभ्यास करतील. वाघाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणाची पाहणी करतील. त्यांच्या सोबतीला ब्रह्मपूरी येथील पथक राहील. हे पथक वाघ पकडण्यात निपून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात वाघ पकडण्याचे प्रयत्न सुरू राहील, असे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, विजय हिंगे यांनी सांगितले. मात्र गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त तत्काळ करा, असे या अधिकाऱ्यांना सांगितले.

Web Title: Terror in Terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.