दहावी विज्ञानचा पेपर फुटला
By Admin | Updated: March 16, 2016 08:39 IST2016-03-16T08:39:18+5:302016-03-16T08:39:18+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे दहावीचा विज्ञानाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच फुटला. मोबाईलवरुन तो

दहावी विज्ञानचा पेपर फुटला
पांढरकवडा : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे दहावीचा विज्ञानाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच फुटला. मोबाईलवरुन तो बाहेर पाठविण्याचा मनसुबा मात्र उधळला गेला. या प्रकरणी केंद्र प्रमुखासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
केंद्र प्रमुख दिलीप चौधरी, सहायक केंद्राधिकारी श्रीकांत आणि विनोद भांडेकर अशी या तिघांची नावे आहे. पांढरकवडा येथील विकास हिंदी विद्यालयात हा गंभीर प्रकार घडला. तेथे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत दहावीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रावर मंगळवारी विज्ञान-२ विषयाचा पेपर होता. हा पेपर फोडून मोबाईलद्वारे त्याचा फोटो बाहेर पाठवून प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार शैलेश काळे यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी ठाणेदार गुलाबराव वाघ, दुय्यम ठाणेदार राखी गेडाम यांना सोबत घेऊन सकाळी ९.४५ वाजता विकास हिंदी विद्यालय गाठले. तेथे केंद्र प्रमुखाच्या कक्षाची तपासणी केली असता प्रश्नपत्रिकेचा एक गठ्ठा फोडलेल्या अवस्थेत आढळून आला. शिवाय केंद्र प्रमुख दिलीप चौधरी, विनोद भांडेकर, श्रीकांत व्ही. यांच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात सदर प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. त्यामुळे त्यांचे मोबाईल जप्त करुन तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. हे तिघेही मोबाईलहून फोटो काढून शाळेच्या बाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच तहसीलदार व ठाणेदारांनी धाड घालून त्या तिघांना ताब्यात घेत त्यांचा मनसुबा उधळला. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात आयटी अॅक्टच्या कलम ७२, माल प्रॅक्टीस प्रिव्हेन्शन अॅक्टच्या कलम ५ आणि भादंविच्या कलम १८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर या परीक्षा केंद्रावर विज्ञान-२ चा पेपर सुरळीत पार पडला. तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)