मध्यस्थाचा खून करणाऱ्यास दहा वर्षे शिक्षा
By Admin | Updated: June 1, 2017 00:10 IST2017-06-01T00:10:48+5:302017-06-01T00:10:48+5:30
घराशेजारी सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थीसाठी गेलेल्याचा दोन भावांनी बेदम मारहाण करून खून केला.

मध्यस्थाचा खून करणाऱ्यास दहा वर्षे शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घराशेजारी सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थीसाठी गेलेल्याचा दोन भावांनी बेदम मारहाण करून खून केला. या प्रकरणी बुधवारी आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
दिनेश वसंत राठोड (३६) रा. किन्ही ता. यवतमाळ, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २९ सप्टेंबर २०११ रोजी आरोपी दिनेश हा मृतकाच्या काकूसोबत वाद घालत होता. हा वाद सोडविण्यासाठी विजय पंडित मिरासे तेथे आला. त्यावेळी आरोपी दिनेश व त्याचा भाऊ गणेश राठोड या दोघांनी लोखंडी सराटा व काठीने विजयला बेदम मारहाण केली. यात दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी विजय मिरासेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी खुनाचा गुन्हा व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषारोपपत्र उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लोखंडे यांनी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने या प्रकरणात १४ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी विष्णू मिरासे याची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. यातील दुसरा आरोपी गणेश राठोड हा मरण पावला आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. एम.एस. गंगलवार, तसेच पैरवी अधिकारी म्हणून उत्तम मडावी यांनी काम पाहिले.