जिद्द व चिकाटीतून तेजस माहुरे याने गाठले शिखर
By Admin | Updated: December 13, 2014 02:29 IST2014-12-13T02:29:11+5:302014-12-13T02:29:11+5:30
तालुक्यातील काठोडा या छोट्याशा गावातील तेजस माहुरे या विद्यार्थ्याने संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी मारून सर्वांनाच आश्चर्यात टाकले आहे.

जिद्द व चिकाटीतून तेजस माहुरे याने गाठले शिखर
आर्णी : तालुक्यातील काठोडा या छोट्याशा गावातील तेजस माहुरे या विद्यार्थ्याने संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी मारून सर्वांनाच आश्चर्यात टाकले आहे. ग्रामीण भागातील तेजसचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी असेच आहे.
तेजसचे वडील येथील म.द. भारती महाविद्यालयात प्राध्यापक असून आई चित्रा माहुरे या सखी मंचच्या कार्यक्रमातून महिलांना पाककला शिकवितात. तेजस बी.कॉम.पर्यंत यवतमाळ येथे शिकला. सध्या तो संगीतात बीए करीत असून लहानपणीच तेजस गाणे गुणगुणत असताना आजोबा रमेश शिवराम माहुरे यांनी त्याला हेरले. त्याचवेळी त्यांनी तेजसला संगीताचे धडे घेण्याचे सूचविले. माहुरे कुटुंबीयांना संगीताची सुरुवात आधीपासूनच होती. काठोडा येथे यांच्या वाड्यावर सुरेश भट, सुधाकर कदम असे संगीत क्षेत्रातील दिग्गज येवून गेले होते. २००२ पासून तेजस माहुरे संगीत क्षेत्रात गीताच्या संगतीला असून आर्णीच्या विविध कार्यक्रमात देशभक्तीपर गीत असो की सिनेगीत असो त्याने आपल्या कलेने आर्णीकरांना भुरळ टाकली. तेजसच्या आवाजाला आर्णीकरांनी अनेकवेळा डोक्यावर घेतले. मागील दहा वर्षांपासून तेजस हा संगीताचे धडे घेत असून सर्व प्रकारच्या संगीतात तो सध्या तयार झाला आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्याकडून त्यांच्या अधिवास गुरूकुलमधून आणि २००२ पासून गायक सुरमणी पंडित, शास्त्रीय गायक प्रभाकर धाकडे यांच्याकडे त्याने संगीताचे धडे घेतले.
अशा दिग्गज गुरूंच्या तालमीत तयार झालेला तेजस याने स्वत: अहोरात्र परिश्रम घेवून आज यशाचे शिखर गाठले आहे. आता तो हजारो चाहत्यांसमोर सिनेगीतांचा कार्यक्रम आर्णी येथे शनिवारला सादर करणार आहे. यावेळी सा रे ग म फेम श्रीनिधी घराटे तथा रेडिओ जॉकी रॉजन (रेडिओ मिर्ची नागपूर) यांच्या उपस्थितीत संगीत गीतांचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन यार्डात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.
२००४ मध्ये अखिल भारतीय सांस्कृतिक शिबिरात पुणे येथे तेजसने सहभाग घेवून सुवर्ण पदक पटकाविले आहे. यवतमाळ येथील लिटील स्टार कार्यक्रमातही तो चमकला. २००० मध्ये समता पर्वात हजेरी लावून त्याने श्रोत्यांची मने जिंकली. नागपूर येथे विदर्भ सुपर सिंगर स्पर्धेत विदर्भाचा सुपर सिंगर म्हणून त्याने बहुमान पटकाविला. यवतमाळच्या रतन पातूरकर, विजय दुरतकर व श्रीधर फडके (अमरावती) यांच्याकडूनसुद्धा त्याने संगीताचे धडे घेतले. त्याचे संगीतातील यश हे इतरांसाठी प्रेरणादायी असून जिद्द, सातत्य व चिकाटीच्या माध्यमातून कोणतेही शिखर पादाक्रांत करता येवू शकते, हे तेजसने आपल्या यशातून दाखवून दिले. (तालुका प्रतिनिधी)