अपंगत्वाच्या नावावर शिक्षकांची पुन्हा शिरजोरी

By Admin | Updated: April 29, 2016 02:30 IST2016-04-29T02:30:45+5:302016-04-29T02:30:45+5:30

बदल्यांचा हंगाम सुरू होताच शिक्षकांच्या पायखालची वाळू सरकली असून बदली टाळण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत.

Teacher's repercussions in the name of disability | अपंगत्वाच्या नावावर शिक्षकांची पुन्हा शिरजोरी

अपंगत्वाच्या नावावर शिक्षकांची पुन्हा शिरजोरी

बदल्या टाळण्याचा प्रयत्न : सर्वसाधारण सभेत चर्चा होऊनही मुद्दा वाऱ्यावर
यवतमाळ : बदल्यांचा हंगाम सुरू होताच शिक्षकांच्या पायखालची वाळू सरकली असून बदली टाळण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. अनेकांनी तर नसलेले अपंगत्त्व सिद्ध करण्याचा पूर्वनियोजित प्रयत्न आता पूर्णत्वास नेण्यासाठी ‘भेटीगाठी’ सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत ‘बोगस अपंग’ शिक्षकांचा मुद्दा पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या मेमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बदलीपात्र शिक्षकांचा तपशील गोळा करण्याच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात राहून ‘अप-डाउन’चा खेळ जमलेल्या शिक्षकांना आता दुसरे गाव टाळायचे आहे. त्यामुळे बदली टाळण्यासाठी काहींनी राजकीय आश्रय शोधला आहे. तर अनेकांनी संघटना नेत्यांचा आसरा घेतला आहे. ही खेळी जुळून येण्यासाठी तथाकथित पारदर्शकतेची मागणीही केली जात आहे.
शिक्षक कर्मचारी अपंग असणे, हा बदली टाळण्याचा सर्वात प्रभावी मुद्दा ठरतो. हीच बाब हेरून काही शिक्षकांनी अपंगत्त्वाचे बोगस प्रमाणपत्र मिळविले. साधारण चार-पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील असे ‘बोगस’ प्रमाणपत्र राज्यभरात गाजले. त्यात अनेक शिक्षकांवर कारवाईदेखील झाली. मात्र, ‘बोगस अपंगत्त्व’ प्रमाणपत्र मिळविण्याचे प्रयत्न सुरूच होते. मध्यंतरी अपंगत्त्व प्रमाणपत्र आॅनलाईन झाले. त्यात बोगस अपंग शिक्षकांची डाळ शिजू शकलेली नाही. आता बदल्यांमध्येही त्यांची डाळ शिजण्याची शक्यता कमीच आहे.
सरल डाटाबेसमध्ये आॅनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारेच शिक्षकांच्या बदल्या होऊ शकणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल ३२३ शिक्षक अपंग असल्याची नोंद कागदोपत्री आहे. मात्र, या पैकी एकाही शिक्षकाने सरलमध्ये आपली माहिती भरताना अपंगत्त्व प्रमाणपत्र सादर केलेले नाही. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तात ही आकडेवारी नमूद आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये अपंग कर्मचाऱ्यांचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी एकाही कर्मचाऱ्याने आॅनलाईन अपंगत्त्वाची नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले होते. यातील काही कर्मचारी खरे अपंग असतानाही त्यांनी आॅनलाईन नोंद केलेली नाही. तर बोगस अपंगांजवळ आॅनलाईन माहिती टाळण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे आॅनलाईन अपंग नसलेले हे शिक्षक शिक्षण विभागाच्या फाईलमध्ये मात्र अपंग आहेत. त्याच आधारावर बदली टाळण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यात शासनाची दिशाभूल होण्याची दाट शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Teacher's repercussions in the name of disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.