विद्यार्थिनीची छेडखानी करणाऱ्या ‘दाते’च्या प्राध्यापकाला बदडले
By Admin | Updated: July 2, 2014 23:26 IST2014-07-02T23:26:56+5:302014-07-02T23:26:56+5:30
विद्यार्थीनीशी असभ्य वर्तन करणाऱ्या प्राध्यापकाला कार्यकर्त्यांनी बदडून नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात घडली.

विद्यार्थिनीची छेडखानी करणाऱ्या ‘दाते’च्या प्राध्यापकाला बदडले
यवतमाळ : विद्यार्थीनीशी असभ्य वर्तन करणाऱ्या प्राध्यापकाला कार्यकर्त्यांनी बदडून नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात घडली.
रूकेश उर्फ राम मधूकर पंचभाई रा.लक्ष्मीनगर वडगाव यवतमाळ असे या प्राध्यापकाचे नाव आहे. तो येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी व पर्यावरण हे विषय शिकवितो. तसेच तो महाविद्यालयीनस्तरावरील एनसीसी अधिकारीही आहे. राळेगाव तालुक्यातील एक विद्यार्थीनी येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शिकते. नविन सत्राच्या प्रवेशासाठी ती १ जुलै रोजी दुपारी महाविद्यालयात आली. तेथे एका खिडकीजवळ थांबून असताना प्रा. पंचभाई याने अंगविक्षेप करून तिची छेड काढली. ही बाब सदर विद्यार्थीनीने आपल्या मैत्रिणीच्या लक्षात आणून दिली.
मात्र प्रा. पंचभाई हा प्रात्यक्षिकाचे गुण देणार नाही या भितीने सदर विद्यार्थीनीने वाच्यता केली नाही. घटनेनंतर प्रा. पंचभाई हा दुचाकीने निघून गेला. दरम्यान आज पिडीत विद्यार्थीनीने ही बाब आपल्या भावाला सांगितली. गेल्या वर्षीसुध्दा त्याने असाच काहीसा प्रकार केल्याचेही ती म्हणाली. त्यावर संतप्त झालेल्या भावाने या गंभीर घटनेची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विवेक गावंडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवा शिवरामवार यांना दिली. त्यावरून आज दुपारी अनिल हमदापूरे, निरज वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महाविद्यालय गाठून प्रा. पंचभाई याला चांगलेच बदडले. वडगाव रोड पोलिसांनाही तेथे पाचारण करण्यात आले. पोलिसांनी प्रा. पंचभाई याला ताब्यात घेतले. सदर विद्यार्थीनिच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांनी त्याच्याविरूध्द भादंवि ३५४ (अ) आणि बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला.
प्रा. पंचभाई याला पोलीस ठाण्यात आणताच तेथे बघ्यांची आणि नागरीकांची गर्दी उसळली होती. महाविद्यालयातही काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)