शिक्षक आमदारांना घेराव
By Admin | Updated: April 3, 2016 03:51 IST2016-04-03T03:51:55+5:302016-04-03T03:51:55+5:30
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना शिक्षकांनी घेराव घातला.

शिक्षक आमदारांना घेराव
विविध मागण्या : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार
यवतमाळ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना शिक्षकांनी घेराव घातला. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आलेल्या आमदारांना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांच्या नेतृत्वात संतप्त शिक्षकांनी गाठले.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. यासंदर्भात आमदार श्रीकांत देशपांडे यांना शिक्षकांनी विचारणा केली. अमरावती जिल्ह्यातील शिक्षक विजय नकाशे यांनी पोषण आहाराच्या तांदळाच्या कारणावरून आत्महत्या केली. या प्रकरणात पंचायतराज समितीच्या सदस्यांवर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. नकाशे यांच्या कुटुंबीयांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. नकाशे यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यासह त्यांची प्रलंबित असलेली पेन्शन केस मंजूर करण्याची मागणी आमदारांकडे करण्यात आली. २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे तांडे, पोड, बेड्यावरील मागास कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये, तसेच शिक्षक, मुख्याध्यापकांकडील शालेय पोषण आहारासह सर्व अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी, राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर शिक्षक भवन देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना घेराव घालतेवेळी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार, संग्राम दहीफळे, राजेश सलाम, दयानंद हातमोडे, संतोष पेंटेवाड, रामदास कांबळे, मिथून पवार, विनोद ढगे, दिलीप तायडे, प्रल्हाद कामाळे, बंडू कुमरे, राजेश नेरलावार, कल्पना उघडे, सीमा पापळकर, अरविंद खेरडे, गजानन उल्हे उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)