शिक्षक समायोजनाचे त्रांगडे
By Admin | Updated: November 25, 2014 23:02 IST2014-11-25T23:02:37+5:302014-11-25T23:02:37+5:30
शिक्षक आहे तेथे विद्यार्थी नाही आणि विद्यार्थी आहे तेथे शिक्षक नाही, अशी विरोधाभासी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांचे समायोजन रखडल्याने विद्यार्थ्यांचे

शिक्षक समायोजनाचे त्रांगडे
जिल्हा परिषद : कुठे रिक्त तर कुठे ठरताहेत अतिरिक्त
यवतमाळ : शिक्षक आहे तेथे विद्यार्थी नाही आणि विद्यार्थी आहे तेथे शिक्षक नाही, अशी विरोधाभासी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांचे समायोजन रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात तब्बल ९५ शिक्षकांची आवश्यकता असताना शिक्षण संचालकांनी कोणताच निर्णय घेतला नाही.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या रिक्त जागेचे त्रांगडे कायम आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात शिक्षकांची तब्बल १०९ पदे रिक्त आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक गावातील पालकांनी आक्रमक पवित्रा घेत शाळांना कुलूप ठोकण्याची तयारी चालविली आहे. कार्यरत शिक्षक दोन-दोन वर्ग सांभाळत आहे. अनेक ठिकाणी तर एका शिक्षकावर तीन-तीन वर्ग सांभाळण्याची वेळ येते. महागाव, उमरखेडमध्ये अशी स्थिती असताना तीन तालुक्यात मात्र शिक्षक अतिरिक्त आहे. कळंब, बाभूळगाव, दारव्हा या तालुक्यात २३ शिक्षक अतिरिक्त आहे. मात्र या अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त ठिकाणी समायोजन करण्यात आले नाही. सप्टेंबर महिन्यात पदनिर्धारण करण्यात येते. परंतु तेही झाले नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना रिक्त जागेवर हलविण्याचा अधिकार जिल्हा परिषद शिक्षण विभागाला नाही. अगदी साधी प्रक्रिया केवळ काही चुकांमुळे अतिशय वेळ खाऊ झाली आहे. या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे.
जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारावी म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार नेहमी घसा कोरडा करतात. परंतु समायोजनासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंध:कारमय होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)