केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
By विशाल सोनटक्के | Updated: September 13, 2025 06:28 IST2025-09-13T06:24:29+5:302025-09-13T06:28:25+5:30
-विशाल सोनटक्के, यवतमाळ पालकत्व आणि परंपरेचे स्मरण मुलांना देऊन ती प्रवाही ठेवण्याची गरज आहे. मात्र, आज-काल मुले ऐकत नाहीत, ...

केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
-विशाल सोनटक्के, यवतमाळ
पालकत्व आणि परंपरेचे स्मरण मुलांना देऊन ती प्रवाही ठेवण्याची गरज आहे. मात्र, आज-काल मुले ऐकत नाहीत, अशी सर्रास पालकांची ओरड ऐकू येते. या समस्येवर महात्मा गांधीजींचा प्रभावी मंत्र लागू ठरू शकतो. पालकांनी मुलांना केवळ शब्दांनी शिकवू नये, तर आपण सांगत असलेल्या विचारांचे स्वत: आचरण करून मुलांसमोर आदर्श ठेवावा. मुले आपोआप शिकतील, घडतील, असा कानमंत्र प्रसिद्ध आध्यात्मिक संत तथा प्रख्यात कथाकार मोरारीबापू यांनी दिला.
डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयाेजित रामकथा महापर्वमध्ये सातव्या दिवशी ते बोलत होते.
पिता पालकही आहे आणि परंपरेचा रक्षकही आहे. ही परंपरा पवित्र आणि दुसऱ्याच्या उपयोगी पडेल अशी परोपकारी हवी. मला भाषण शैलीचे ज्ञान आहे. गांधीजींची ही शैली फार प्रभावी नव्हती. त्यांचा आवाज भारदस्त नव्हता आणि व्यक्तिमत्त्वही सर्वसाधारण होते. तरीही बलदंड ब्रिटिश साम्राज्याविरुद्धचा अंतिम आणि निर्णायक लढा त्यांनी ‘छोडो भारत’ या छोट्याशा मंत्रावर जिंकला, कारण त्यांच्या शब्दामध्ये प्रचंड ताकद होती. हे शब्द आचारणात डुंबून निघालेले होते. त्यामुळेच बंदुकीच्या गोळीप्रमाणे ते समोरील माणसाच्या आरपार निघत. राजकीय, सामाजिक मूल्यांच्या आधारावर आणि स्ववर्तनातून त्यांनी जीवन घडविले होते. त्यामुळेच मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर त्यांनी ‘चले जावो’ची घोषणा केल्यानंतर लाखो भारतीयांनी हे दोन शब्द हृदयावर कोरून आंदोलनात उडी घेतली. आचारण करा आणि नंतर बोला हे महात्माजींचे सूत्र पालकांनी अवलंबिल्यास त्यांचा तक्रारींचा सूर कमी होईल, असे मोरारीबापू म्हणाले.
नागपूरच्या ‘एनसीआय’ला ७० लाख रुपयांचा निधी
२००२ मध्ये पूज्य श्री रमेशभाई ओझा यांचा भागवत कथा सोहळा यवतमाळ येथे आयोजित केला होता. त्याप्रसंगी मानव सेवा समिती या संस्थेकडे देणगी स्वरूपात निधी जमा झाला होता. समिती अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांनी नुकतीच बैठक घेतली.
यवतमाळचे अनेक रुग्ण कॅन्सरवरील उपचारासाठी नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (एनसीआय) जातात. त्यामुळे सदर निधी एनसीआयला देण्याचा निर्णय डॉ. दर्डा यांनी घेतला.
त्यानुसार, शुक्रवारी एनसीआयचे कार्यवाहक शैलेश जोगळेकर यांच्याकडे ७० लाखांचा धनादेश मोरारीबापू यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी समिती कार्याध्यक्ष अरुणभाई पोबारू, खजिनदार किशोर दर्डा, कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रकाश नंदूरकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रामकथा सोहळ्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९:४० वाजता चिंतामणी बाजार समिती आवारात सुरू असलेल्या रामकथा पर्व सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्यावर आधारित ‘पेन ॲन्ड पर्पज’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.