‘चाय पे चर्चा’ नव्हे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:31 IST2018-03-27T23:31:21+5:302018-03-27T23:31:21+5:30
तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने ......

‘चाय पे चर्चा’ नव्हे उपोषण
ऑनलाईन लोकमत
आर्णी : तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने या शेतकऱ्यावरच आता शेताच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.
गेल्या २0१४ मधील लोकसभा निवडणुकीपासून दाभडी हे गाव सतत चर्चेत आहे. निवडणुकीनंतर तर गाव आणखीच प्रकाशझोतात आले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच गावाला त्यावेळी भेट दिली होती. त्यांनी गावातील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी, नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला होता. भाजपाला सत्ता देण्याचे आवाहन केले होते. नंतर देशात परिवर्तन होऊन मोदी थेट पंतप्रधान झाल्याने साहजिकच गावकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र गावकऱ्यांच्या साध्या समस्याही सुटणे आता कठीण झाल्याचे दिसत आहे.
दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी अमोल रामभाऊ दिवाने यांच्या घरी बनविण्यात आला होता. त्यामुळे अमोल दिवाने चर्चेत आले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना आपली समस्या सुटेल असे वाटले होते. मात्र झाले उलटेच. गेल्या काही वर्षांपासून अमोल आपल्या शेतात जायला रस्ता नसल्याने त्रासून गेले आहे. रस्त्यासाठी त्यांनी वारंवार लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. ‘आपले सरकार पोर्टल’वर तक्रार देऊनही लाभ झाला नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार राजू तोडसाम यांना समस्या सांगूनही उप्योग झाला नाही. यामुळे हतबल झालेल्या अमोल दिवाने यांनी सोमवारपासून आर्णी तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
शेती राहिली पडिक
शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अमोल दिवाने यांची शेती पडीत राहिली आहे. त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शेती पडीत असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. ‘मोदी साहेब’ प्रधानमंत्री झाले, भाजपाचेच हंसराज अहीर खासदार अन् केंद्रात राज्यमंत्री बनले, तर राजू तोडसाम आमदार झाले. तरीही न्याय मिळत नसल्याबद्दल दिवाने यांनी संताप व्यक्त केला आहे. अखेर न्यायासाठीच आमरण उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे त्यांनी सांगितले.