वृषभचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून

By Admin | Updated: July 3, 2016 02:27 IST2016-07-03T02:27:28+5:302016-07-03T02:27:28+5:30

खासगी बँकेतील रोखपालाचा निर्घृण खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

Taurus murdered with suspicion of immoral relations | वृषभचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून

वृषभचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून

घाटंजी बायपासवर मारले : तीन आरोपींना पोलीस कोठडी
अकोलाबाजार : खासगी बँकेतील रोखपालाचा निर्घृण खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात यवतमाळातून तिघांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वृषभ सुधाकर चौधरी (३०) रा. धनश्रीनगर पिंपळगाव याचा धारदार चाकूचे ३२ वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याचे प्रेत कोळंबी शिवारातील जंगलात गुरुवारी सकाळी आढळून आले होते. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने सायबर सेलमधील कविश्व पाळेकर यांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आरोपींचा माग काढला. यात यश दिलीप छतवाणी (२०) रा. सिव्हील लाईन यवतमाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गोलू उर्फ अनिकेत बोरले (२०) रा. चमेडियानगर, ऋषिकेश पुरुषोत्तम गडमडे (१९) रा. गोदाम फैल या दोघांना यशने दिलेल्या माहितीवरून अटक केली. ही करवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांच्या पथकातील इक्बाल शेख, नीलेश राठोड यांनी केली.
या तिघांना वडगाव जंगल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी वडगाव जंगलचे ठाणेदार राऊत यांनी आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत वापरलेली इंडिगो कार क्र. एम.एच.४३-एन-८५८ जप्त करण्यात आली. सदर कार भगवतीप्रसाद दुबे या पुजाऱ्याच्या मालकीची असून त्यावर यश छतवाणी हा चालक म्हणून होता. या तिघांनीच ही गाडी किरायावर घेतली होती. दरम्यान यश छतवाणी याने घटनेच्या दिवशी २९ जून रोजी मोबाईलवर संपर्क साधून वृषभला यवतमाळ येथील पांढरकवडा मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ बोलाविले. तेथून या तिघांनी एका बारमध्ये मद्यप्राशन केले. त्यानंतर वृषभची दुचाकी तेथेच ठेऊन घाटंजी बायपासकडे गेले. वाहनातच वृषभवर धारदार चाकूने तब्बल ३२ वार करण्यात आले. त्याचा गळाही चिरण्यात आला.
यानंतर हा मृतदेह कोळंबी जंगलात फेकण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले. वृषभचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सध्या तीनही आरोपी यवतमाळ शहर ठाण्याच्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्यांच्याकडून या खुनाची माहिती घेत आहे. (वार्ताहर)

Web Title: Taurus murdered with suspicion of immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.