तस्कर शेख चाँद वनविभागाला शरण
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:00+5:302015-12-05T09:09:00+5:30
यवतमाळ वन विभागातील अवैध वृक्षतोड प्रकरणाचा सूत्रधार शेख चाँद शेख रहेमान (५०) हा अखेर शुक्रवारी पांढरकवडा वन परिक्षेत्र कार्यालयाला शरण आला.

तस्कर शेख चाँद वनविभागाला शरण
सागवान तस्करी : पिंपळखुटी चेक पोस्टवरील प्रकरण, चार दिवसांची वनकोठडी
पांढरकवडा : यवतमाळ वन विभागातील अवैध वृक्षतोड प्रकरणाचा सूत्रधार शेख चाँद शेख रहेमान (५०) हा अखेर शुक्रवारी पांढरकवडा वन परिक्षेत्र कार्यालयाला शरण आला.
येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन.एच. तिखे यांच्यापुढे शेख चाँदला हजर केले असता ७ डिसेंबरपर्यंत त्याला वन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पांढरकवडा वन परिक्षेत्र अधिकारी बाबाराव पवार यांच्या पथकाने १५ आॅक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी चेक पोस्टवर सागवानाचा ट्रक पकडला होता. चौकशी दरम्यान हे सागवान अवैध व त्यावरील हॅमरही बोगस असल्याचे निष्पन्न झाले. एवढेच नव्हे तर अशा पद्धतीने हैदराबादकडे आठ व नागपूरकडे पाच ट्रक सागवान अवैधरीीत्या पाठविल्या गेल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा सूत्रधार शेख चाँद असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. अखेर शुक्रवारी तो वन विभागाला शरण आला. मात्र वन विभागाने गुरुवारी सायंकाळी शेख चाँदच्या घरी जाऊन कुटुंबीयांची समजूत घातली, तो अटक न झाल्यास त्याच्या पुढे कशा अडचणी वाढतील हे सांगितले. त्यानंतर आज पहाटे शेख चाँदला त्याच्या यवतमाळातील घरी अटक केल्याचा दावा आरएफओ बाबाराव पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. त्याच्या ताब्यातून बोगस हातोडा-हॅमर जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख चाँदचा दिवाणजी आणि ट्रक चालक-वाहकाला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. दिवाणजीने सागवान तोडीतील वास्तव उघड केले होते. चोरीतील हे सागवान यवतमाळ वन विभागांतर्गत येणाऱ्या संरक्षित जंगलांमधील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावर वन यंत्रणेच्या संगनमताने बोगस हॅमर मारले गेल्याचे उघड झाले. मात्र त्यानंतरही या वृक्षतोड व बोगस हॅमर प्रकरणी वन खात्यात अद्याप कुणावरच कारवाई झालेली नाही, हे विशेष. शेख चाँद अटक झाल्याने तो आपल्या बयाणात आता काय उघड करतो, कुणा-कुणाची नावे घेतो, याकडे लक्ष लागले आहे. शेख चाँदच्या अटकेने त्याच्याशी वन खात्यात राहून वृक्षतोडी व बोगस हॅमरसाठी हातमिळवणी करणाऱ्या वन अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (तालुका प्रतिनिधी)