१२ हजार कृषिपंपांना वीज पुरवठ्याचे टार्गेट
By Admin | Updated: January 11, 2017 00:36 IST2017-01-11T00:36:03+5:302017-01-11T00:36:03+5:30
जिल्ह्यात सध्या कृषीपंपांसाठी ८८८३ अर्ज प्रलंबित आहे. तसेच पुढील तीन महिन्यात ३२७९ ग्राहक कृषीपंपासाठी अपेक्षित आहेत.

१२ हजार कृषिपंपांना वीज पुरवठ्याचे टार्गेट
३१ मार्च डेडलाईन : ८८८३ प्रलंबित अर्ज, १५५ कोटींची गरज
यवतमाळ : जिल्ह्यात सध्या कृषीपंपांसाठी ८८८३ अर्ज प्रलंबित आहे. तसेच पुढील तीन महिन्यात ३२७९ ग्राहक कृषीपंपासाठी अपेक्षित आहेत. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत १२ हजार १६२ कृषी वीज ग्राहकांना वीजजोडणी देण्याचे टारगेट जिल्हा महावितरणसमोर आहे.
महावितरणला १२ हजार १६२ कृषी कनेक्शन देण्यासाठी एकूण १५५ कोटी ९४ लाख रुपयांच्या निधीची आवश्यक आहे. यापैकी सध्या जिल्हा महावितरणकडे शासनाने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या विशेष पॅकेज व जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या निधीमुळे ९६ कोटी एक लाख रुपये उपलब्ध आहे. यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (डिपीटीसी) मधून ६ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून ३२२ कृषी वीज कनेक्शन देता येईल. जिल्हा नियोजन समिती, पायाभूत आराखडा आणि विशेष पॅकेजचे मिळून ९६ कोटी एक लाख रुपये निधी महावितरणकडे उपलब्ध आहे. या एकूण निधीतून सहा हजार ५६५ कृषी वीज कनेक्शन देता येतील. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून सहा कोटी दहा लाख रुपये मिळाले आहे. महावितरणच्या पायाभूत आराखड्याअंतर्गत दहा लाख रुपये शिल्लक आहेत आणि शासनाने विषेश पॅकेज अंतर्गत ८९ कोटी ८१ लाख रुपये दिले होते. त्यामुळे एकूण ९६ कोटी एक लाखांचा निधी सध्या महावितरणकडे उपलब्ध आहे.
१२ हजार १६२ कृषी पंपांचे टारगेट पाहता यासाठी ५९ कोटी ९३ लाख रुपये कमी पडू शकतात. हा निधी न मिळाल्यास ५ हजार ५९७ कनेक्शन पेंडिग राहतील, परंतु पुढील तीन महिन्यात अपेक्षित लोकांनी अर्ज केले नाही तर यातून अर्ज कमी होऊ शकतील. कृषी पंपांसाठी ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत पैसे भरलेले प्रलंबित अर्ज ८८८३ आहेत. व अपेक्षित ग्राहक ३२७९ असे एकूण १२ हजार १६२ कृषी पंप कनेक्शन देण्याचे टारगेट आहे.
यापैकी शासनाच्या विदर्भ विशेष पॅकेजमधून मिळालेल्या ८९ कोटी ८१ लाख रुपयांपैकी ७५ कोटी ७० लाख रुपयंचे टेंडर काढण्यात आले होते. उर्वरित चार ते साडेचार कोटी रुपयांसाठी टेंडर काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)