तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा..!
By Admin | Updated: January 9, 2017 01:55 IST2017-01-09T01:55:19+5:302017-01-09T01:55:19+5:30
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा देत रविवारी यवतमाळात विदर्भस्तरीय साहित्य संमेलन पार

तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा..!
राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर : विदर्भस्तरीय साहित्य संमेलनात उद्बोधक परिसंवाद, गुरुदेव सेवा मंडळ, भारतीय विचार मंचचे आयोजन
अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळ
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा देत रविवारी यवतमाळात विदर्भस्तरीय साहित्य संमेलन पार पडले. यावेळी उद्बोधक परिसंवादांसह जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान जागविणारी राष्ट्रसंतांची भजने गुंजली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, आडकोजी महाराज, विनोबा यांच्या जुन्या छायाचित्रांतून सुधारकांचा वैभवी गतकाळ पुन्हा जिवंत करण्यात आला.
श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि भारतीय विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नंदूरकर विद्यालयाच्या साईरंजन सभागृहात हे एकदिवसीय संमेलन झाले. सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. संमेलनाध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांच्या ओजस्वी भाषणाने उद्घाटनसत्र गाजविले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांची आवश्यकता अधोरेखित केली. राष्ट्रसंतांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, आचार्य हरिभाऊ हिरुळकर, प्रकाश महाराज वाघ, डॉ. सुभाष लोहे यांनीही अधिकारवाणीने विचारांची पेरणी केली.
या संमेलनात दोन परिसंवाद झाले. ‘राष्ट्रसंतांची राष्ट्रधर्म संकल्पना’ परिसंवाद डॉ. रमाकांत कोलते यांच्या अध्यक्षतेत रंगला. डॉ. रेखा महाजन, प्रा. कोमल ठाकरे, अरूण नेटके या वक्त्यांनी जोरकस विचार मांडले.
राष्ट्रसंतांच्या साहित्याप्रमाणेच त्यांची भाषणेही तेवढीच प्रेरक होती, असा विचार अरुण नेटके यांनी उद्धृत केला. सुशिक्षित बेरोजगार ही संकल्पना राष्ट्रसंतांना मान्यच नव्हती. सुशिक्षित झालेली व्यक्ती बेरोजगार राहणार असेल, तर ती शिक्षणव्यवस्थाच बदलली पाहिजे, असा विचार महाराजांनी मांडल्याने नेटके म्हणाले. ग्रामगीतेने चिरंतन मूल्यांचे जतन केले आहे. धर्म हा भारतीय जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जीवनाला जो आकार देतो, तोच खरा धर्म आणि अशाच राष्ट्रधर्माचा राष्ट्रसंतांनी विचार मांडल्याचे डॉ. रेखा महाजन म्हणाल्या. देवभक्ती आणि देशसेवेचा योग्य समन्वय साधत राष्ट्रसंतांनी आपल्याला योग्य मार्ग दाखविला.
सुरूवातीला संतपरंपरेचे केंद्र पश्चिम महाराष्ट्रात होते. राष्ट्रसंतांनी ते विदर्भात आणल्याचा उल्लेख डॉ. कोमल ठाकरे यांनी केला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यांनी केले.
दुसरा परिसंवाद ‘स्वावलंबी व स्वयंपूर्ण ग्रामसंकल्पना’ या विषयावर झाला. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक घाडगे होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ‘ग्रामगीतेतील ग्रामनिर्माण’ संकल्पनेवर विस्तृत मांडणी केली. सतपाल सोवळे यांनी ग्रामगीतेतील गोवंश सुधार हा विषय मांडताना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात गायींची संख्या वाढण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. हरितक्रांतीमुळे सध्या रोगराई वाढली असून गाईच्या शेणखताचा वापर वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर तिसऱ्या वक्त्या डॉ. अरुंधती कावडकर यांनी ‘सामूदायिक प्रार्थना आणि व्यक्तीनिर्माण’ हा विषय जोरकसपणे मांडला.
भजने, छायाचित्रे, रांगोळी आणि ग्रामगीता
४‘स्वर गुरूकुंजाचे’ संचाने राष्ट्रसंतांची भजने सादर करून संमेलनात रंग भरला. संमेलनाच्या परिसरात राष्ट्रसंतांच्या छायाचित्रांची प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रत्येक रसिकाने या प्रदर्शनाला भेट दिली. पुस्तकांच्या स्टॉलवरून ग्रामगीतेची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. ही विक्री ‘ना नफा ना तोटा’ यानुसार झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सभागृहाच्या प्रवेशद्वारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची वेधक मुद्रा रांगोळीतून रेखाटण्यात आली होती. ही रांगोळी काढणारे अरूण लोणारकर यांचे पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. ‘तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा’ ही राष्ट्रवंदना घेऊन सामुदायिक प्रार्थनेने संमेलनाचा समारोप झाला.
विचारांची ‘लस’ घेऊन अनुयायी ‘चार्ज’!
४समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी सत्चिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश नंदूरकर होते. ते म्हणाले, संमेलन झाले आता पुढे काय? आपल्याला ग्रामगीता पाठ झाली. पण त्यातले विचार कृतीत उतरविण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. प्रत्येकाने सेवाभाव जागृत ठेवून समाजात काम केले पाहिजे. सर्वधर्म सामूहिक विवाह मेळावे झाले पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्यसेवा, ग्रामसेवा ही कामे केली पाहिजे. आपण बोललो तसे वागलो नाही, तर चळवळ मागे पडते. तर संमेलनाध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख म्हणाले, इथला प्रत्येक जण राष्ट्रसंतांच्या विचारांनी ‘चार्ज’ झाला आहे. हे चार्जिंग कधीच उतरू नये. समाजाच्या गरजेनुरूप धर्म ‘अपडेट’ झाला पाहिजे. प्रत्येकाने कृतिशील झाले पाहिजे. डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी संमेलनाचे महत्त्व विदित करताना सांगितले की, राष्ट्रसंतांच्या विचारांचे हे आरोग्य शिबिर आहे. आज आपण सर्व जण या आरोग्य शिबिरातून लसयुक्त झालो आहोत. डॉ. राजेंद्र नाईकवाडे, स्वागताध्यक्ष राजूदास जाधव यांनीही विचार मांडले. याप्रसंगी आ. अशोक उईके उपस्थित होते. सुलक्षणा भुयार यांनी आभार मानले.