खासगी जागेत बांधले तालुका क्रीडा संकुल
By Admin | Updated: June 28, 2015 23:58 IST2015-06-28T23:58:40+5:302015-06-28T23:58:40+5:30
तालुक्यातील खेळाडुंसाठी हक्काचे क्रीडा संकुल असावे याकरिता शासनाने ग्रामपंचायतींकडून संकुलासाठी जागा मिळविली.

खासगी जागेत बांधले तालुका क्रीडा संकुल
कळंब येथील प्रकार : आठ वर्षानंतर फुटले बिंग, १५ लाखांचा खर्च, जमीन मालकाचा शोध घेण्यासाठी दवंडी
नीलेश भगत यवतमाळ
तालुक्यातील खेळाडुंसाठी हक्काचे क्रीडा संकुल असावे याकरिता शासनाने ग्रामपंचायतींकडून संकुलासाठी जागा मिळविली. मोठ्या थाटामाटात तत्कालीन स्थानिक मंत्री, आमदाराने दोनदा भूमिपूजन केले. आणि तब्बल आठ वर्षानंतर क्रीडा संकुल हे खासगी जागेत उभारल्याचे उघडकीस आले आहे. कळंबच्या तालुका क्रीडा संकुलावर १५ लाख रुपये खर्च केले. मात्र हे सर्व काम खासगी जागेत असल्याने शासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
नवीन क्रीडा धोरणानुसार तालुक्याच्या ठिकाणी एकाच परिसरात विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा व प्रशिक्षणाच्या दृष्टीने अद्ययावत सुविधांनी युक्त असे क्रीडा संकुल उभारण्याची योजना आहे. यासाठी राज्य शासन प्रत्येक तालुक्याला एक कोटींचा निधी देत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने या योजनेसाठी ई-क्लास जागेची निवड करून जागा अधिग्रहीत करणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात क्रीडा धोरणानुसार १६ तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. कळंब येथे २००५-०६ मध्ये क्रीडा संकुलासाठी जोडमोहा रोडवरील गट क्र. ६२६ मधील तीन हेक्टर ७७ आर जागा निवडण्यात आली. तत्कालिन जिल्हा क्रीडा अधिकारी जयप्रकाश डुबळे यांनी ग्रामपंचायतीकडून या जागेसंदर्भात करारनामाही करून घेतला. याच ठिकाणी खेळाडुंसाठी आता क्रीडा संकुल होणार आहे, या बातमीने तालुक्यात आनंदाचे वातावरण होते. तत्कालिन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते क्रीडा संकुलाच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. २०१२-१३ मध्ये या संकुलाच्या बांधकामाचा प्रारंभ झाला. तेव्हा वसंत पुरके यांच्या हस्ते दुसऱ्यांदा भूमिपूजन करण्यात आले. या जागेवर क्रीडा विभागाने सध्या लेव्हलिंग व रिटर्रनिंग वॉलचे काम केले आहे. यावर १५ लाख रुपये खर्चही करण्यात आला.
आॅक्टोबर २०१४ मध्ये मात्र तालुका क्रीडा संकुलाची जागा ही ई-क्लासची नसून एका खासगी व्यक्तीच्या मालकीची असल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली. यामुळे ग्रामपंचायत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली आहे. चुकीने का होईना खासगी जागेत शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च झाला. यातून मार्ग काढण्यासाठी कळंबच्या तहसीलदाराने जाहिरनामा काढला. ज्या व्यक्तीची ही जागा असेल त्याने १५ दिवसांच्या आत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. हा जाहिरनामा ग्रामपंचायत फलकावर प्रसिद्ध करण्यात आला असून, ग्रामपंचायतीने याची दवंडीही दिली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पुढील तजवीज म्हणून कळंब येथे क्रीडा संकुलासाठी पर्यायी जागेचा शोधही घेतला आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये खंड भूमापन क्र. ४९५ मधील २ हेक्टर ८० आर जागा निश्चित केली आहे. जागेच्या मोजणीसाठी शासनाकडे ३५ हजार रुपयांचे शुल्कही भरले आहे.
कळंबच्या क्रीडा संकुलाची जागा निश्चित करताना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायतीने कोणतीच दक्षता घेतली नाही. ई-क्लासची जागा समजून थेट खासगी व्यक्तीच्या मालकीतील जागेवर शासनाच्या पैशाने बांधकामही केले. या गंभीर प्रकाराची दखल
घेऊन जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना चांगलेच धारेवर धरले. याबाबत स्पष्टीकरणही मागितले आहे.