तालुक्याला नऊ कोटींचे उद्दिष्ट

By Admin | Updated: March 19, 2015 02:11 IST2015-03-19T02:11:28+5:302015-03-19T02:11:28+5:30

पुसद तालुक्याला यावर्षी ९ कोटी १५ लाख एक हजार रुपयांचे विविध शासकीय तथा निमशासकीय कार्यालयांमार्फत शासकीय कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Taluka aims at nine crores | तालुक्याला नऊ कोटींचे उद्दिष्ट

तालुक्याला नऊ कोटींचे उद्दिष्ट

पुसद : पुसद तालुक्याला यावर्षी ९ कोटी १५ लाख एक हजार रुपयांचे विविध शासकीय तथा निमशासकीय कार्यालयांमार्फत शासकीय कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मार्च अखेरीसपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. आतापर्यंत केवळ १९.७४ टक्केच उद्दिष्टपूर्ती झाली आहे. यावर्षी तालुक्यातील अवर्षणग्रस्त परिस्थितीमुळे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही वसुली एक मोठे आव्हान ठरत आहे.
पुसद तालुक्यात एकूण आठ सर्कल आहे. त्यापैकी तहसीलदार भगवान कांबळे यांच्याकडे गौळ (खुर्द), शेंबाळपिंपरी, जांबबाजार व ब्राह्मणगाव ही चार तर नायब तहसीलदार देवानंद धबाले यांच्याकडे पुसद, वरूड, बेलोरा व खंडाळा ही चार सर्कल आहेत. त्या अनुषंगाने तहसीलदार कांबळे आणि नायब तहसीलदार धबाले यांच्या पथकाने गौण खनिजांतर्गत अवैधरीत्या वाळू वाहून नेणाऱ्या कंत्राटदार व ट्रॅक्टर जप्तीच्या माध्यमातून तब्बल ४० लाख रुपयांचा शासकीय महसूल गोळा केला आहे.
प्रपत्र अ, ब आणि क मिळून पुसद तहसीलला तब्बल नऊ कोटी १५ लाख एक हजार रुपये महसूल गोळा करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रपत्र अ मधील अकृषक कर, शिक्षण कर, नझुल व रोहयो कर आदींचे ९९ लाख ५९ हजारांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ४५ लाख ५७ हजार ६६१ रुपये अर्थात ४५.७६ टक्के इतकी वसुली करण्यात आली आहे. तसेच संकीर्ण व इतर वसुलींमध्ये ५५ लाख रुपयांचे उद्दिष्ट असून त्यापैकी १४ लाख ८० हजार ५३७ रुपयांची वसुली झाली आहे. या वसुलीचे प्रमाण २६.९१ टक्के इतके आहे.
प्रपत्र ब मधील गौण खनिज (रॉयल्टी), करमणूक कर, विविध विभागांच्या वसुलीचे एकूण उद्दिष्ट सात कोटी ६० लाख ४२ हजार देण्यात आले आहे. त्यापैकी एक कोटी २० लाख २९ हजार ९८२ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या वसुलीची टक्केवारी १५.८२ एवढी आहे. गौण खनिजाचे उद्दिष्ट चार कोटींचे असून त्यापैकी ८५ लाख ९७ हजार ८११ रुपयांची अर्थात २१.४९ टक्के वसुली करण्यात आली आहे. करमणूक कराचे ४६ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट असून त्यापैकी २५ लाख सहा हजारांची वसुली झाली आहे. त्याचे प्रमाण ५३.८९ टक्के एवढे आहे. त्याचप्रमाणे विविध विभागांकडील थकीत कर बाकीचे उद्दिष्ट तीन कोटी १३ लाख ९२ हजारांचे असून त्यापैकी केवळ नऊ लाख २६ हजारांची अर्थात ०२.९४ टक्केच वसुली झाली आहे. महसूल विभागांतर्गत संबंधित थकबाकीदारांना तहसीलदार भगवान कांबळे यांच्यामार्फत सूचनापत्र देण्यात आले असले तरी त्यांचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. मार्च एंडिंगसाठी जेमतेम १२-१३ दिवस उरले असताना वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोठी कसरत ठरत आहे. त्यातच यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवर्षणग्रस्त स्थिती असून वसुलीसाठी मोठा अडथळा यामुळे निर्माण झाल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Taluka aims at nine crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.