जलयुक्तच्या गावांमध्ये नरेगातून कामे घ्या

By Admin | Updated: February 27, 2016 02:52 IST2016-02-27T02:52:21+5:302016-02-27T02:52:21+5:30

सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जात आहे.

Take the work from Jalgaon villages in NREG | जलयुक्तच्या गावांमध्ये नरेगातून कामे घ्या

जलयुक्तच्या गावांमध्ये नरेगातून कामे घ्या

व्ही. गिरीराज : पालक सचिवांकडून विविध बाबींचा आढावा
यवतमाळ : सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमास नरेगाची जोड देणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये जलयुक्तची कामे केली जात आहे, तेथे नरेगामधून जमीन व जलसंधारण उपचाराची कामे घेण्यात यावी, असे निर्देश पालक सचिव व्ही. गिरीराज यांनी दिले.
बचत भवन येथे व्ही. गिरीराज यांनी जलयुक्त शिवार, नरेगा, धडक सिंचन आदींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, रोहयोचे उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, कृषी विद्यापीठाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. सुभाष टाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाला नरेगाची जोड दिल्यास जलसंधारणाची अनेक नवीन कामे घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे जलयुक्तच्या गावात प्राधान्याने नरेगाची कामे घ्या, असे गिरीराज म्हणाले. शेततळे, विहीर पुनर्भरण यासह शेतात शोषखड्ड्याचा व्यापक कार्यक्रम घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्याची दोन भागात विभागणी करून अर्ध्या भागात कृषी विभागाच्या वतीने तर उर्वरित अर्ध्या भागात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेत खड्ड्याचा कार्यक्रम राबवा. विशेषत: जलयुक्तच्या गावांना यासाठी प्राधान्य द्या, असे त्यांनी सांगितले.
रोजगार हमी योजनेंतर्गत आता बहुतांश कामे ग्रामपंचायतमार्फत होत असल्याने कृषी विभागाने ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात अधिकाधिक कामे केली पाहिजे. रोहयोमध्ये निधीची कमतरता नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांची त्यांनी माहिती घेतली. सामाजिक संस्थांच्या वतीने जलसंधारणाबाबत विविध कामांचे सादरीकरणही झाले. डॉ. सुभाष टाले यांनी कोरडवाहू शेतीत पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Take the work from Jalgaon villages in NREG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.