ताई, सीईओंना आदेश द्या!
By Admin | Updated: July 3, 2016 02:28 IST2016-07-03T02:28:05+5:302016-07-03T02:28:05+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे अडलेले घोडे पुन्हा धावण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे बदलीसमर्थक शिक्षकांनी देव पाण्यात ठेवले असून कसेही करून बदल्या कराच,

ताई, सीईओंना आदेश द्या!
बदल्यांसाठी धडपड : आमदारांच्या माध्यमातून शिक्षकांचे मंत्र्यांना साकडे
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे अडलेले घोडे पुन्हा धावण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे बदलीसमर्थक शिक्षकांनी देव पाण्यात ठेवले असून कसेही करून बदल्या कराच, त्यासाठी जिल्हा परिषद सीईओंना आदेश द्या, अशी विनवणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करण्यासाठी वारंवार मुंबईवाऱ्या सुरू झाल्या आहे.
स्थगिती उठविल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान न करता २५ जूनपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश ग्रामविकास विभागाने दिला होता. पण हा आदेशच २४ जून रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेत धडकला. त्यामुळे एका दिवसात शेकडो शिक्षकांच्या बदल्या कशा होणार, हा पेच सीईओंपुढे निर्माण झाला. यावर्षी बदल्याच करू नये, या मानसिकतेपर्यंत जिल्हा परिषद प्रशासन पोहोचले. परंतु बदलीसमर्थक शिक्षकांचा रेटा बघता जिल्हा परिषद अध्यक्षांनी बदल्यांसाठी २५ जूनऐवजी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळण्याची मागणी ग्रामविकास विभागाला केली. या मागणीला आठवडा लोटला तरी मुदतवाढीबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे शिक्षकाने जिल्हा परिषदेचा परिघ ओलांडून थेट ग्रामविकास मंत्र्यांकडे विनवणी केली.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील अशोक उईके आणि संजीवरेड्डी बोदकुरवार या दोन आमदारांनीही शिक्षकांचे समर्थन केले. बदल्यांसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी, असे लेखी पत्र दोन्ही आमदारांनी ग्रामविकास मंत्र्यांना दिले आहे. पूर्वीच्या बदली प्रक्रियेतील घोळाबाबत विभागीय आयुक्तांनी चौकशी करून ७ जून रोजीच मंत्रालयात अहवाल दिला. मात्र त्यावर निर्णय घेण्यासाठी तब्बल २२ जूनपर्यंतचा वेळ घेण्यात आला. त्यामुळेच स्थगिती उठवून बदली प्रक्रिया पुन्हा राबविण्याचा आदेश जिल्हा परिषदेला ऐनवेळी मिळाला. एका दिवसात ही प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यामुळे आता ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचा आदेश सीईओंना द्यावा, अशी मागणी दोन्ही आमदारांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. आमदारांच्या मागणीचा कितपत विचार केला जातो, याकडे बदलीसमर्थक शिक्षकांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)