वाघग्रस्त राळेगाव तालुक्यात ‘तडशा वाघा’चे पिलांसह दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:49 IST2018-10-15T21:48:54+5:302018-10-15T21:49:12+5:30
नरभक्षक वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा राळेगाव तालुक्यात युद्धस्तरावर शोध घेतला जात आहे. ही वाघीण काहीकेल्या सापडत नसली तरी रविवारी ‘तडशा वाघा’चे दोन पिलांसह शेतकऱ्यांना दर्शन घडले.

वाघग्रस्त राळेगाव तालुक्यात ‘तडशा वाघा’चे पिलांसह दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : नरभक्षक वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचा राळेगाव तालुक्यात युद्धस्तरावर शोध घेतला जात आहे. ही वाघीण काहीकेल्या सापडत नसली तरी रविवारी ‘तडशा वाघा’चे दोन पिलांसह शेतकऱ्यांना दर्शन घडले. वाघासारखाच दिसणारा आणि सोबत दोन बछडे बसलेला तडस पाहून शेतकºयांची पाचावर धारण बसली होती. मात्र माणसांना पाहून तडस पळून गेला. तर त्याची दोन पिले शेतकºयांच्या तळहातावर रमली.
कारेगाव येथील सुहास तेलतुंबडे यांच्या शेतात कापूस वेचणी सुरू असताना महिलांना तुरीच्या तासात दोन पिलांसह तडस वाघ आढळला. मजुरांनी आरडाओरड करताच तडसाने पिल्ले सोडून पळ काढला. यानंतर आजूबाजूच्या शेतातील शेतकरी व शेतमजूर तेथे गोळा झाले. किन्हीचे पोलीस पाटील अनुराग जवादे यांनी वडकीचे सहायक ठाणेदार दीपक कांग्रेडवार यांना माहिती दिली. लगेच त्यांनी पिलांची शहानिशा करण्यासाठी वन विभागाला छायाचित्र पाठविले. त्यात ही पिल्ले तडसाचीच असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.
या शिवारामध्ये तडस वाघाचे दर्शन झाल्याने शेतकरी व मजूर भयभीत झाले आहे. वन विभागाचे राऊत यांना याबाबत माहिती देण्यात आली. राऊत यांनी तडस हा वाघाचा प्रकार असला तरी भयभीत होण्याची गरज नसल्याचे सांगितले.