सामाजिक सलोख्याचे प्रतीक गणबादेव गणपती

By Admin | Updated: September 1, 2014 23:54 IST2014-09-01T23:54:40+5:302014-09-01T23:54:40+5:30

गणेशोत्सवाला महाराष्ट्रात लोकजागृती आणि लोक प्रबोधनातून प्रारंभ झाला. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवत पुसद येथील गणबादेव गणेश मंडळ गत १०९ वर्षांपासून प्रबोधनाची परंपरा जोपासत आहे. सामाजिक सलोख्याचे

Symbol of social harmony Ganabadev Ganapati | सामाजिक सलोख्याचे प्रतीक गणबादेव गणपती

सामाजिक सलोख्याचे प्रतीक गणबादेव गणपती

१०९ वर्षांची परंपरा : मुस्लीम कारागिरांकडून रथाची निर्मिती, भोईबांधव ओढतात रथ, पुसदचे ग्रामदैवत
प्रकाश लामणे - पुसद
गणेशोत्सवाला महाराष्ट्रात लोकजागृती आणि लोक प्रबोधनातून प्रारंभ झाला. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवत पुसद येथील गणबादेव गणेश मंडळ गत १०९ वर्षांपासून प्रबोधनाची परंपरा जोपासत आहे. सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या गणबादेवाच्या रथाची निर्मिती मुस्लीम कारागिरांनी केली असून दरवर्षी भोईबांधव हा रथ ओढून आपली परंपरा जोपासत आहे.
संपूर्ण राज्यात पुसद हे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभलेले शहर आहे. येथे विविध उपक्रम राबविण्याची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी तर पुसद नगरीला स्वराज्याची पंढरी असे संबोधले होते. त्याच लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या गणेशोत्सवाची अस्सल परंपरा पुसदचा गणबादेव गणेश मंडळ राखत आहे. पूस नदीच्या तीरावर हुडकेश्वर वार्डात १९०५ साली धारु पाटील यांनी १९०५ साली गणबादेवाची स्थापना केली. त्यानंतर दुसऱ्या पिढीतील सखाराम पाटील, तिसऱ्या पिढीतील दत्तराव पाटील, चौथ्या पिढीतील शेषराव पाटील आदींनी समाज प्रबोधनाचा वसा कायम ठेवला. आजच्या धावपळीच्या युगातही गणबादेव गणेशोत्सवाने आपले पावित्र्य जोपासले आहे. जातीय व सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण केला आहे.
२०११ पासून भक्तगणांनी गणबादेवाला ११ ग्रॅम सुवर्णदंत आणि १४ किलो वजनाच्या चांदीच्या रत्नजडित सिंहासनावर विराजमान केले आहे. गणबादेवाच्या डोक्यावरील चांदीचे छत्र मूर्तीची शोभा वाढवीत आहे. गणबादेव गणेशोत्सव मंडळ दरवर्षी भजन, कीर्तन यासह व्यसनमुक्ती कार्यक्रम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वृक्षारोपण, नेत्रदान गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.
स्थापना व विसर्जनाच्या दिवशी लक्षवेधी नक्षीकाम केलेल्या रथातून गणबादेवाची मिरवणूक काढण्यात येते. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील शेख सर्फराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणबादेवाचा रथ तयार केला आहे. तर पारंपरिक पद्धतीने गणबादेवाचा रथ येथील भोईबांधव ओढतात हेच गणबादेवाचे महत्वाचे वैशिष्ट्य होय.
सध्या गणेशोत्सवाची धुरा शरद पाटील, मधुकर पंडितकर, विलास पंडितकर, सुधाकर वाशिमकर, ललित सेता, सुदेश सांबरे, सतीश पंडितकर, संजय शेंडे, अजय पाटील, सुरेश चौधरी यशस्वीपणे सांभाळत आहे.

Web Title: Symbol of social harmony Ganabadev Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.