स्वतेज, श्रीतेज अन् शुभ्राला हवे हक्काचे आई-वडील
By Admin | Updated: December 17, 2015 02:31 IST2015-12-17T02:31:02+5:302015-12-17T02:31:02+5:30
कोणत्याही कुटुंबात मूल जन्माला येणे हा त्या कुटुंबासाठी अतिव आनंदाचा क्षण. मात्र काही अपरिहार्य कारणांनी हा आनंदाचा क्षण नकोसा वाटतो ...

स्वतेज, श्रीतेज अन् शुभ्राला हवे हक्काचे आई-वडील
चिमुकल्यांचा टाहो : सापडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांच्या शोधासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडपड
यवतमाळ : कोणत्याही कुटुंबात मूल जन्माला येणे हा त्या कुटुंबासाठी अतिव आनंदाचा क्षण. मात्र काही अपरिहार्य कारणांनी हा आनंदाचा क्षण नकोसा वाटतो आणि मुलाला बेवारस सोडून दिले जाते. अशाच स्वतेज, श्रीतेज आणि शुभ्रा या तीन बालकांना आपल्या हक्काच्या आई-वडिलांची प्रतीक्षा आहे. यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्ष धडपडत आहे.
दीड महिन्यांपूर्वी लाडखेड, घाटंजी आणि कळंब येथे अनुक्रमे स्वतेज, श्रीतेज आणि शुभ्रा ही तीन बालके बेवारस सोडून दिल्याचे आढळून आले. जन्म होताच या बालकांच्या नशिबी उपेक्षिताचे जीणे आले.
काही कळायच्या आत त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आले. ७ नोव्हेंबर रोजी लाडखेड आणि घाटंजी परिसरातील एका शेतात पुरुष जातीचे बाळ स्वतेज आणि श्रीजेत आढळून आले, तर २६ सप्टेंबर रोजी कळंबच्या बसस्थानकावर शुभ्रा सापडली. संपूर्णपणे आईवर अवलंबून असलेल्या या चिमुकल्यांना त्यांची आई सोडून गेली. तीनही ठिकाणच्या पोलिसांनी शोधाशोध केली. परंतु थांगपत्ता लागला नाही. अखेर या बालकांना बालकल्याण समिती यवतमाळच्या आदेशाने संत गाडगे महाराज शिशुगृह वर्धा येथे दाखल करण्यात आले. शिशुगृहातील कर्मचारी या बालकांसाठी आई-वडिलांची भूमिका बजावत आहे.
मात्र या तिघांनाही हक्काचे आई-वडील मिळावे म्हणून बालसंरक्षण समितीने पुढाकार घेतला आहे. ज्या कुणाला या बाबत माहिती असेल त्यांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रवी आडे यांनी केले आहे. आणखी एक महिना या बाळांच्या नातेवाईकांची वाट बघण्यात येईल. त्यानंतर बालकल्याण समितीच्या आदेशानुसार मुलांना दत्तक विधानाकरिता मुक्त घोषित करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)