सव्वादोनशे जागा, दीड हजार नामांकन
By Admin | Updated: November 1, 2016 02:07 IST2016-11-01T02:07:18+5:302016-11-01T02:07:18+5:30
नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करताना आॅनलाईनचा अडथळा पार करीत जिल्ह्यातील

सव्वादोनशे जागा, दीड हजार नामांकन
यवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करताना आॅनलाईनचा अडथळा पार करीत जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेत नगरसेवकांच्या २१४ जागांसाठी तब्बल एक हजार ५५४ नामांकन दाखल झाले. तर आठ नगराध्यक्ष पदासाठी ११० जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. अखेरच्या दिवशी अर्जाचा पाऊस पडल्याने प्रशासकीय यंत्रणाही गोंधळून गेली होती. छाननी आणि उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची निवडणूक होत आहे. यासाठी यंदा प्रथमच आॅनलाईन नामांकन बोलविण्यात आले. सुरुवातीचे दोन दिवस एकही नामांकन दाखल झाले नाही. त्यानंतर आॅनलाईन प्रक्रियेत नेटवर्क जामचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यास आयोगाने मंजुरी दिली. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा मार्ग सुकर झाला. आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यास ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आयोगाने वाढवून दिली आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षासह आघाड्या आणि अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या २१४ नगरसेवकांच्या जागांसाठी तब्बल १ हजार ५५४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. सर्वाधिक अर्ज यवतमाळ नगरपरिषदेत दाखल झाले आहे. ५६ जागांसाठी ४५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर आॅफलाईन पद्धतीने ५४ अर्ज भरण्यात आले आहे.
दारव्हा नगरपरिषदेच्या २० जागांसाठी १५३ अर्ज दाखल झाले असून त्यातील १३९ आॅनलाईन आणि २४ अर्ज आॅफलाईन आहेत. घाटंजी नगरपरिषदेत १७ जागांसाठी १३५ नामांकन दाखल झाले असून १११ अर्ज आॅनलाईन तर २२ अर्ज आॅफलाईन आहे. दिग्रस नगरपरिषदेच्या २३ जागांसाठी १६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात आॅनलाईन १३८ आणि आॅफलाईन १६ अर्ज आहे. पुसदमध्ये २९ जागांसाठी २०७ अर्ज दाखल झाले असून त्यात २५ अर्ज आॅफलाईन आहेत. उमरखेडमध्ये २४ जागांसाठी १८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्यात २७ अर्ज आॅफलाईन आहेत. वणी नगरपरिषदेत २० जागांसाठी २३५ नामांकन दाखल झाले असून ११ नामांकन आॅफलाईन आहे. आर्णी नगरपरिषदेत १९ जागांसाठी १२७ जणांनी उमेदवारी दाखल केली असून त्यात सहा अर्ज आॅफलाईन पद्धतीने आहे.
अर्जांची छाननी आणि उमेदवारी मागे घेतल्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तूर्तास अनेकांनी प्रचाराला प्रारंभ केला असून जिल्ह्यात दिवाळीचे वातावरण निवडणूकमय झाले आहे. तर उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेकांची मनधरणी सुरु आहे. (शहर वार्ताहर)
आठ नगराध्यक्ष पदांसाठी ११० उमेदवार
४यवतमाळ जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ११० उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. यवतमाळ नगरपरिषदेत १७, दारव्हा १४, घाटंजी १२, दिग्रस २०, पुसद ७, उमरखेड १४, वणी २४ आणि आर्णीत ६ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनही केले.