‘सुत्त पिटकात’ आढळतात स्त्री स्वातंत्र्याची बिजे
By Admin | Updated: January 30, 2016 02:46 IST2016-01-30T02:46:46+5:302016-01-30T02:46:46+5:30
थेरी गाथा बुद्धाच्या काळातील अनन्य साधारण व मौल्यवान असा ग्रंथ आहे. त्रिपिटकातील तिसरा भाग म्हणजे सुत्तपिटक या थेरी गाथा प्रकरणात स्त्रीमुक्तीवादी वैचारिकतेची सशक्त बिजे आढळतात.

‘सुत्त पिटकात’ आढळतात स्त्री स्वातंत्र्याची बिजे
रूपेश कऱ्हाडे : प्रबोधन मंडळाच्यावतीने व्याख्यान
दिग्रस : थेरी गाथा बुद्धाच्या काळातील अनन्य साधारण व मौल्यवान असा ग्रंथ आहे. त्रिपिटकातील तिसरा भाग म्हणजे सुत्तपिटक या थेरी गाथा प्रकरणात स्त्रीमुक्तीवादी वैचारिकतेची सशक्त बिजे आढळतात. १८ व्या शतकामध्ये पाश्चात्य विचारवंतांनी या ग्रंथातील स्त्री स्वातंत्र्यवादी विचारांवर प्रकाश टाकला. तेव्हापासून या ग्रंथातील थेरी म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वीच्या शौर्यवान बुद्धीवान स्त्रिया होय, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रुपेश कऱ्हाडे यांनी येथे केले.
स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंडळाच्यावतीने आयोजित ‘थेरी गाथा’ या विषयावरील व्याख्यानात ते शुक्रवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका रुपा मानकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मधुकर वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष देविदास खंडारे, डॉ. आंबेडकर प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तम राऊत उपस्थित होते. प्रा.डॉ. कऱ्हाडे म्हणाले, प्रोफेसर आर.पिशेल या जर्मन विचारवंताने प्रथम थेरी गाथा प्रकाशात आणल्या. त्यानंतर ऱ्हीस डेव्हीड्स यांनी इंग्रजी अनुवाद केला. पुढे १८९९ मध्ये कॅथरीन ब्लेकस्टोन व १८९८ मध्ये मीना तालीम यांनी या ग्रंथाला प्रसिद्धी मिळवून देत भारतात प्रकाशित केला. त्यानंतर बुद्धकन्यांच्या मुक्तीगाथा थेरीगाथा हा ग्रंथ डॉ. रुपा कुळकर्णी-बोधी यांनी लिहून मराठीत प्रकाशित केला. या प्रकाराने भारतातील गाथा पाश्चिमात्य देशातून परत भारतापर्यंत या थेरीग्रंथाद्वारे पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
थेरीगाथांमध्ये स्त्री मुक्तीची बिजे सापडतात. यातील किसा गौतमी, मुक्त खेमा, आम्रपाली, पटाचारा, सोमाथेरी या सारख्या ७३ थेरीच्या ५२२ गाथा व १६ संग्रह प्रकाशित आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला तुकाराम उबाळे, विनायक देवतळे, कुसुमताई जांगडे, उद्धव अंबुरे, महादेव धुळध्वज, चिंतामण मनवर, प्रदीप नगराळे, किसन हस्ते, यशवंत भरणे, पुरुषोत्तम मेश्राम, शामराव खाडे, बुद्धीवंता खाडे, प्रा.नंदू वानखडे, लता भरणे, ताई रंगारी, गुंजन कऱ्हाडे, विवेक सरदार, गोल्डी कऱ्हाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)