तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला
By Admin | Updated: May 1, 2015 02:05 IST2015-05-01T02:05:00+5:302015-05-01T02:05:00+5:30
झरीजामणी तालुक्यातील भीमनाळा येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत वांगू सूर्यभान टेकाम ...

तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला
मुकुटबन : झरीजामणी तालुक्यातील भीमनाळा येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत वांगू सूर्यभान टेकाम (४०) यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात घातपाताचा संशय बळावला असून पाटण पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे.
गेल्या २६ एप्रिलपासून वांगू टेकाम गायब होते. त्या दिवशी गावात एक लग्न होते. लग्नाची धामधूम सुरू होती. याप्रसंगी गावात मृतक वांगू टेकाम, त्यांचा साळा महादेव मोतू आत्राम (४०) आणि चंद्रभान नानाजी मेश्राम (२२) हे तिघे नेहमीप्रमाणे सोबत वावरत होते. ते तिघेही एकत्रच होते. रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास ते गावालगतच असलेल्या भीमनाळा तलाव परिसरात फिरायला गेले. तेथे त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती प्राप्त झाली. दिवसभर मद्य प्राशन करून असल्याने ते तिघेही नशेतच होते. हा वाद विकोपाला गेल्याची शक्यता आहे.
दरम्यान, दोन दिवस मृतक वांगू टेकाम घरी परतलाच नव्हता. त्यानंतर मंगळवारी २८ एप्रिल रोजी त्यांचा साळा महादेव आत्राम याने पाटण पोलीस ठाणे गाठून २६ एप्रिलपासून भाऊजी वांगू टेकाम बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच ते गावानजीक असलेल्या डोंगरावरील झाडाला फाशी घेऊन आढळल्याची माहिती दिली. यानंतर पाटण येथे नव्यानेच रूजू झालेले ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय मदने यांनी महादेवला सोबत घेऊन तडक घटनास्थळ गाठले. तेथे पंचनामा करून मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मडावी यांना माहिती दिली.
दोन दिवसांपासून सडलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे जागीच शवविच्छेदन करण्यात आले. मात्र हा आत्महत्या की घातपाताचा प्रकार, याबाबत गोंधळ होता.
ठाणेदार मदने यांनी महादेवच्या हालचालीवरून त्यालाच बुधवारी ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. आता शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ही आत्महत्या आहे की हत्या, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या प्रकरणाचे गूढ कायमच राहणार आहे. मृतकाच्या पाठीमागे पत्नी व तीन मुली आहेत. त्यातील दोन मुलींचे लग्न व्हायचे आहे. (शहर प्रतिनिधी)