उमरखेड : तालुक्यातील मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रातातील हलगर्जीपणामुळे झालेल्या माता व बालमृत्यू प्रकरणी महिला आरोग्य सेविकेला निलंबित करण्यात आले. तर आरोग्य सहायकाची एक वर्ष वेतनवाढ रोखण्यात आली. तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्याला सक्त ताकीद देण्यात आली आहे. या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बेबीनंदा थोरात या गरोदर मातेला व्यवस्थित उपचार मिळाले नाही. त्यामुळे तिचा व बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई व्हावी या उद्देशाने उमरखेड तहसीलसमोर तिच्या नातेवाईकांनी उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत महिला आरोग्य सहायक एस.एन.मुद्गल यांना तत्काळ निलंबित करण्यात आले तर आरोग्य सहायक व्ही.एस.गौरखेडे आणि सुनीता तायडे यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सक्त ताकीद देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाला जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणातील चौकशी अधिकारी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अहवाल सादर केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान उपोषणकर्ते आपल्या उपोषणावर ठाम असून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
माता व बालमृत्युप्रकरणी आरोग्य सहायक निलंबित
By admin | Updated: December 22, 2014 22:55 IST