महिलेच्या खुनात संशयित ताब्यात
By Admin | Updated: May 30, 2017 01:16 IST2017-05-30T01:16:09+5:302017-05-30T01:16:09+5:30
स्थानिक सूरजनगरातील महिलेच्या खुनामागे वेगळीच मिस्ट्री असल्याचा संशय पोलिसांना आहे.

महिलेच्या खुनात संशयित ताब्यात
तांत्रिक बाजूने तपास : पोटावर चाकूचे दहा वार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक सूरजनगरातील महिलेच्या खुनामागे वेगळीच मिस्ट्री असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने तपास सुरू असून एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर मिळालेले दोन मोबाईल या तपासाची दिशा ठरत आहे. त्यावरूनच आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. विविध पथकाने माहिती गोळा करणे सुरू केले आहे.
पपिता निलध्वज कांबळे (३९) या महिलेचा तिच्या घरातच खून करण्यात आला. तिच्या पोटावर चाकूने तब्बल दहा वार करण्यात आले. त्यानंतर गळा कापण्याचा प्रयत्न केला. नंतर डोक्यावर जड वस्तूने प्रहार करण्यात आला. शिवाय या महिलेचे ओठही अर्ध्यापेक्षा जास्त फाटलेले होते. अतिशय क्रूरपद्धतीने हा खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
घटनास्थळावरील काही परिस्थितीजन्य पुराव्यावरून या प्रकरणाला वेगळेच वळण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उपविभागीय अधिकारी पीयूष जगताप यांनी हा तपास हातात घेतला असून विविध पथकाच्या माध्यमातून संशयास्पद ठिकाणी आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान रात्री एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.
मात्र त्याच्याकडून खुनासंदर्भात कुठलीही माहिती वृत्तलिहिपर्यंत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. हा खून नेमका कुणी व का केला यावर लक्ष केंद्रीत केले आहे. एकंदरच महिलेच्या खुनाची मिस्ट्री पोलिसांपुढेही आव्हानात्मक आहे. मात्र दोन दिवसात या घटनेचा संपूर्ण उलगडा होईल, असाही विश्वास पोलीस यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.