तरुणाच्या खूनप्रकरणी एका संशयितास अटक
By Admin | Updated: January 24, 2015 23:01 IST2015-01-24T23:01:36+5:302015-01-24T23:01:36+5:30
दुचाकी अपघातात मृत्यू नसून मुलाचा घातपात झाल्याचा तालुक्यातील बेलदरी येथील पित्याने आरोप केल्याने पोलिसांनी पुरलेले प्रेत उकरून शवविच्छेदन केले. तसेच संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा

तरुणाच्या खूनप्रकरणी एका संशयितास अटक
महागाव : दुचाकी अपघातात मृत्यू नसून मुलाचा घातपात झाल्याचा तालुक्यातील बेलदरी येथील पित्याने आरोप केल्याने पोलिसांनी पुरलेले प्रेत उकरून शवविच्छेदन केले. तसेच संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
मधुकर नारायण जाधव असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. १६ जानेवारी रोजी बेलदरी- नांदगव्हाण पुलाजवळ दुचाकी अपघात होवून वैभव मुरलीधर जाधव या १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा अपघाती मृत्यू नसून वैभवचा घातपात झाल्याचा आरोप करीत मुरलीधर जाधव यांनी महागाव पोलिसात तक्रार दिली. तसेच शवविच्छेदनाची मागणी केली. त्यावरून शुक्रवारी वैभवचे पुरलेले प्रेत बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालानुसार त्याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे पुढे आले. त्यावरून पोलिसांनी गावातीलच मधुकर नारायण जाधव याला शुक्रवारीच संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. आज महागाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या कोठडीदरम्यान वैभवच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. आणि नेमका काय प्रकार आहे, हेही कळण्यास मदत होणार आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.