रखवालदार दाम्पत्यावर हल्ला, वृद्धेचा मृत्यू
By Admin | Updated: March 6, 2016 03:07 IST2016-03-06T03:07:50+5:302016-03-06T03:07:50+5:30
रखवालदार दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात वृद्ध महिला जागीच ठार झाली. तिचा पती मृत्यूशी झुंज देत आहे.

रखवालदार दाम्पत्यावर हल्ला, वृद्धेचा मृत्यू
खोरद येथील घटना : पतीची मृत्यूशी झुंज
डोंगरखर्डा : रखवालदार दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात वृद्ध महिला जागीच ठार झाली. तिचा पती मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता खोरद शिवारातील शेतात घडली. रंगू गोपाळ सुरपाम (६०) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. गोपाळ सुरपाम (६५) यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कुसळ येथील उद्धव बकाले यांच्या संत्र्याच्या शेतात गोपाळ सुरपाम आणि रंगू गोपाळ सुरपाम हे दाम्पत्य रखवालदार म्हणून मागील तीन महिन्यांपासून काम करत होते. सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास गोपाळ हा रक्तबंबाळ अवस्थेत शेतशेजारी विठ्ठल गदई यांच्याकडे मदतीचा धावा करत पोहोचला. गदई यांनी क्षणाचाही विलंब न करता मोटरसायकलने गाव गाठले. घटनेची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. गावातून पुन्हा शेतात परतताना गोपाळची पत्नी रंगू गोपाळ सुरपाम ही मृतावस्थेत आढळून आली. गावकऱ्यांनी गोपाळला तत्काळ कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथून यवतमाळ येथे हलविण्यात आले. या दाम्पत्यावर कुणी हल्ला केला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यांच्या रखवालदारकीचा हिशेब १ मार्च रोजी करण्यात आला होता. शनिवारी ते गावी निघणार होते, असे सांगितले जाते. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. (वार्ताहर)