वसंतनगर परिसरात साथीच्या रोगांचे थैमान

By Admin | Updated: August 24, 2014 23:47 IST2014-08-24T23:47:06+5:302014-08-24T23:47:06+5:30

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या गावांमध्ये साथीच्या रोगांचे थैमान आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वेळवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परवड होत आहे.

Surrounded by pandemic diseases in Vasantnagar area | वसंतनगर परिसरात साथीच्या रोगांचे थैमान

वसंतनगर परिसरात साथीच्या रोगांचे थैमान

वसंतनगर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या गावांमध्ये साथीच्या रोगांचे थैमान आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वेळवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. या केंद्राचा कारभार ढेपाळला असून, गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण कल्याण समितीची सभाच झाली नाही.
ग्रामीण जनतेच्या आरोग्याला नवसंजीवनी देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यात आले आहे. मात्र यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी ग्रामीण भागात सेवा देण्याच्या मानसिकतेत नाही. निर्धारित वेळेत आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी कधीच उपलब्ध नसतात. त्यामुळे नियमित वेळेत आलेल्या रुग्णालाही तासन्तास वाट पाहून शेवटी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. ही बाब आता नित्याचीच झाली आहे. यावर्षी दिग्रस तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने विषाणुजन्य आजाराने डोके वर काढले आहे.
सर्दी, खोकला, डोकेदुखी, हिवताप यामुळे प्रत्येक कुटुंब बेजार झाले आहे. अशाही स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाहीत. दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण येथे डॉक्टरांची वाट पहात असतात. या आरोग्य केंद्राची वेळ सकाळी ८ ते १२ असूनसुद्धा वेळेत डॉक्टर उपलब्ध होत नाही. यामुळे शेवटी नाईलाजाने रुग्णांना बोगस डॉक्टरकडे उपचार घ्यावा लागतो. अन्यथा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.
आरोग्य केंद्राच्या कारभाराचा आढावा घेणारी रुग्ण कल्याण समितीही निष्क्रिय असल्याचे दिसून येते. अनेक दिवसांपासून रुग्ण कल्याण समितीची सभाच झालेली नाही. या समितीचा कारभार केवळ कागदोपत्रीच चालत असल्याचे दिसून येते. जुलै २०१३ मध्ये सभा झाली होती.
तेव्हापासून आजतागायत रुग्ण कल्याण समितीची एकही सभा झालेली नाही. या समितीतील पैशातून अत्यावश्यक वस्तू आणि औषधी खरेदीचा अधिकार आहे. याचा वापर प्रत्यक्षात रुग्णांसाठी होत नसताना दिसून येतो. एकंदरच ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला घरघर
लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)

Web Title: Surrounded by pandemic diseases in Vasantnagar area