साहित्य नसल्याने शस्त्रक्रिया अडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:33 IST2019-04-17T21:32:52+5:302019-04-17T21:33:51+5:30
जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सातत्याने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातात. मागील काही दिवसापासून नेत्रशस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधी व साधन सामुग्री शासनस्तरावरून पुरविण्यात आली नाही.

साहित्य नसल्याने शस्त्रक्रिया अडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सातत्याने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातात. मागील काही दिवसापासून नेत्रशस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधी व साधन सामुग्री शासनस्तरावरून पुरविण्यात आली नाही. यामुळे नेत्र शस्त्रक्रिया रखडल्या आहे.
नेत्रशस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या इंजेक्शन, सोलुलोज आणि पॅनल ब्लेडस उपलब्ध नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करणेच थांबले आहे. यासाठी जिल्हा अंधत्व निवारण समितीच्या अध्यक्ष तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे यांनी सहसंचालक आरोग्यसेवा असंसर्गजन्य रोग यांना ३ एप्रिल रोजी पत्रव्यवहार केला. अजूनही औषधी व साहित्य उपलब्ध झालेले नाही. आयुर्वेदिक रुग्णालय यवतमाळ, उपजिल्हा रुग्णालय दारव्हा, उपजिल्हा रुग्णालय पुसद आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ या ठिकाणी सातत्याने अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो.
शासनस्तरावरून औषधी पुरवठ्याबाबत दुर्लक्ष झाल्याने अंध गरीब रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत सहसंचालक स्तरावरून तातडीने काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी हे विकास कामे सांगण्यात व्यस्त आहे. प्रत्यक्ष औषधी पुरवठ्याची स्थिती मागील चार वर्षापासून अतिशय दयनीय आहे. केवळ राजकीय उद्देशासाठी रुग्णसेवेचा देखावा करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अनेक आरोग्य शिबिराच्या आडून महागडी औषधी इतरत्र हलविण्यात आली. परिणामी नियोजन कोलमडले. आता गरजू व अत्यावश्यक असलेल्या रुग्णांवरही शस्त्रक्रिया करता येत नाही. रुग्णांकडे आर्थिक तरतूद नसते. असली तरी स्थानिक डॉक्टर बाहेरून औषधी लिहून देवू शकत नाही. अशा कचाट्यात अंध रुग्ण अडकले आहे.