दैवतांना निरोप देताना प्रदूषणाला पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:28+5:30

नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले.

Supporting pollution while saying goodbye to the gods | दैवतांना निरोप देताना प्रदूषणाला पाठबळ

दैवतांना निरोप देताना प्रदूषणाला पाठबळ

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । जलस्त्रोतांमध्ये कचरा, यवतमाळ नगर पालिकेची यंत्रणा करतेय स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गणेशोत्सवाचे दहा दिवस मोठ्या जल्लोषात साजरे झाले. विसर्जनही तेवढ्याच उत्साहात पार पडले. मात्र विसर्जनानंतर गणरायाच्या मूर्तींची अवस्था काय, असा प्रश्न निर्माण व्हावा, असे चित्र शहरानजीकच्या विविध जलस्त्रोतांमध्ये सध्या दिसत आहे. भाविकांनी पाण्यात सोडलेल्या मूर्ती दोन दिवसानंतरही विसर्जित होण्याचीच वाट पाहात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या यंत्रणेलाच त्यांची व्यवस्था करावी लागत आहे.
मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या सामान्य नागरिकांनाच हे विचित्र चित्र आढळले, हे विशेष. त्यांनी याबाबत खंतही व्यक्त केली. ते म्हणाले, सध्याचे दिवस हे सणावारांचे आहेत. नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले. तेलकट असणारे हे नष्ट न होणारे द्रोण -पत्रावळी पुढे अनेक वर्ष पर्यावरणाचे नुकसान करत राहणार आहे. पाण्यात राहणारे जीव या तेलाच्या तवंगाने आणि द्रोण पत्रावळीच्या कचऱ्याने गुदमरून जाणार आहेत.
घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या गणरायाला आम्ही ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव करीत नुकताच निरोप दिला. ढोल ताशांच्या, भजनांच्या गजरात गणराया विसर्जित झाले. आम्ही फार मोठे धार्मिक कार्य संपन्न झाल्याच्या भावनेने कृतकृत्य झालो. आजकाल आमचे लाडके बाप्पा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमधून विराजमान होऊन आमच्याकडे येतात. आम्हाला गणपती बाप्पाला विराजमान तर करायचे असते, पण महाग नको म्हणून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमधील बाप्पांना घातक रंगासहीत आम्ही विराजमान करतो.
दहा दिवस अगदीच मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर आम्हाला लगबग असते ती बाप्पांना विसर्जित करण्याची. गणरायांना आम्ही सार्वजनिक अथवा नैसर्गिक स्वच्छ जलस्रोतांमध्ये भक्तिभावाने विसर्जित करतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रासायनिक रंगांमुळे गणराया प्रत्यक्षात विसर्जित होतच नाहीत. आम्ही मात्र बाप्पांचे विसर्जन झालेय या पूज्य भावनेने घरी जाऊन प्रसादाचे वाटप करतो. इकडे आमचे लाडके बाप्पा मात्र पाण्यात इतस्तत: पडून विसर्जित होण्याची वाट पाहत आहेत.

एरवी प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत काहीच करीत नाहीत असे ओरडणारे आम्ही सर्वत्र प्रदूषण करीत असतो. स्थानिक प्रशासन मात्र विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध मानव यंत्रणेला सोबत घेऊन जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी आणि आमच्या आराध्य गणरायाची विटंबना रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. दैवतांचे देवत्व आणि पर्यावरणाचे संरक्षण हेसुद्धा धार्मिक कार्यच आहे. धर्माचे पालन उन्मादाने नव्हे तर उन्मेषाने केले पाहिजे.
- मिलिंद देशपांडे
शिक्षक (यवतमाळ)

Web Title: Supporting pollution while saying goodbye to the gods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.