दत्तात्रय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : घरात अठरा विश्व दारिद्र्य. त्यातही पितृछत्र हरविलेले. घरात आईसह केवळ तिघी बहिणी. अशाही परिस्थितीत कुशाग्र सुनिताने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पीएसआय बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. एवढेच नव्हे, तर तिने राज्यातून चक्क दुसरा क्रमांक प्राप्त केला.विडूळ येथील आदिवासी समाजातील सुनिता उमीनवाडे, या युवतीची ही कहाणी. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद कन्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण सीतामाय कन्या शाळेत झाले. नंतर दहावी झाल्यावर सुनिता ढाणकी येथील कस्तुरबा गांधी कन्या शाळेत गेली. तेथूनच २०१० मध्ये बारावी उत्तीर्ण केली. नंतर शिक्षिका व्हावे, या हेतूने तिने कळंब येथील डीएड कॉलेजला प्रवेश घेतला. दरम्यान, तिच्या वडिलांचे निधन झाले. तिला आर्थिक चणचण भासू लागल्याने तिने शिक्षण सोडण्याच्या विचार केला. आईला ही बाब कळताच तिने सुनिताला धीर दिला. राहत्या घराची काही जागा विकून पैसे पाठविले.डीएड केल्यानंतर शिक्षक भरती बंद झाली. त्यामुळे सुनिताने हिमायतनगर येथे बहिणीकडे राहून काही काळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अल्पशा मानधनावर शिक्षिकेची नोकरी पत्करली. आईचे स्वप्न पूर्ण करण्यास कमी पडत असल्याची खंत तिला सतावत होती. मग सुनिताने पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचे ठरविले. बचतीच्या पैशातून २०१४ मध्ये माहूर येथील रेणुका संस्थेअंतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीए प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. तेव्हापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नंतर सुनिता पुसद येथे मामा देवराव लांडगे यांच्याकडे आली. मामा व त्यांचा मुलगा तुषार यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पदवी घेतल्यानंतर तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २०१७ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली.पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली. महाराष्ट्रातून अनुसूचित जमाती महिलेतून तिने चक्क दुसरा क्रमांक पटकाविला. अभ्यासीका, शिकवणी वर्ग न लावता दररोज १२ तास स्वंयअध्ययनाचे धडे गिरवीत तिने हे यश प्राप्त केले.
विडूळच्या चंद्रमौळी झोपडीतील सुनीता बनली फौजदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 21:44 IST
घरात अठरा विश्व दारिद्र्य. त्यातही पितृछत्र हरविलेले. घरात आईसह केवळ तिघी बहिणी. अशाही परिस्थितीत कुशाग्र सुनिताने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पीएसआय बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. एवढेच नव्हे, तर तिने राज्यातून चक्क दुसरा क्रमांक प्राप्त केला.
विडूळच्या चंद्रमौळी झोपडीतील सुनीता बनली फौजदार
ठळक मुद्देराज्यात दुसऱ्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण : मुक्त विद्यापीठातून पदवी घेऊन घेतली भरारी, आई-मामाची प्रेरणा