निकाल ऐकण्यासाठी सोसले उन्हाचे चटके
By Admin | Updated: May 17, 2014 00:30 IST2014-05-17T00:30:06+5:302014-05-17T00:30:06+5:30
सकाळी ८ वाजतापासून मतगणनेला सुरुवात झाली. ९.३0 वाजताच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवायला लागले. दुपारी १२ वाजेपर्यंत तर सूर्य डोक्यावर आला होता.

निकाल ऐकण्यासाठी सोसले उन्हाचे चटके
यवतमाळ : सकाळी ८ वाजतापासून मतगणनेला सुरुवात झाली. ९.३0 वाजताच्या सुमारास उन्हाचे चटके जाणवायला लागले. दुपारी १२ वाजेपर्यंत तर सूर्य डोक्यावर आला होता. दर अर्धा तासाने माईकमधून फेरीनिहाय मतदानाची आकडेवारी घोषित होत होती. उन्हाचे चटके सोसत नागरिक ही आकडेवारी जाणून घेत होते. त्यांचा हा उत्साह वाखाणण्याजोगाच होता. निवडणूक विभागाने १६ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याचे घोषित केले होते. त्यासाठी पूर्वसंध्येलाच तयारी करण्यात आली. विना विलंब सकाळी ८ वाजताच्या सुमारास मतदान गणनेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार अँड. शिवाजीराव मोघे आघाडीवर होते. पहिल्या फेरीची घोषणा होताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. प्रतिबंधित क्षेत्रापुढे लागून असलेल्या पोलिसांच्या बॅरेकपुढे घोषणा आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता. सूर्य आग ओकत असताना साधारणत: ११ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी ऐकण्यासाठी गोळा झालेली नागरिकांची गर्दी ओसरेल असा अंदाज होता. मात्र सूर्य जस जसा डोक्यावर येत होता तस तशी नागरिकांची गर्दी मतदानाची आकडेवारी ऐकण्यासाठी वाढतच होती. त्यातच दुसर्या फेरीपासून भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी प्रत्येक फेरीत मतांची आघाडी घेतली. या वेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी तेथून ओसरली. मात्र शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची जागा घेतली. फेरीनिहाय मतदानाच्या आकडेवारीची घोषणा होताच ती स्पष्ट ऐकू यावी म्हणून नागरिक पोलिसांनी लावलेल्या बॅरेकजवळ यायचे. घोषणा आणि नारेबाजींनी परिसर दणाणून सोडायचे. उन्हाचे चटके सोसत त्यांनी मतमोजणीची आकडेवारी जाणून घेतली. त्यांचा हा उत्साह भावना गवळी यांच्या विजयाचा जल्लोषच असल्याचे दिसून येत होते. विशेष म्हणजे या गर्दीला नियंत्रणासाठी पोलिसांनाही फारशी कसरत करावी लागली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)