क्षणिक रागातून मातेची चिमुकल्यासह विहिरीत आत्महत्या
By Admin | Updated: December 9, 2014 22:57 IST2014-12-09T22:57:00+5:302014-12-09T22:57:00+5:30
क्षुल्लक कारणावरून पतीसोबत झालेल्या वादात क्षणिक रागातून एका मातेने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरानजीकच्या भोसा परिसरात

क्षणिक रागातून मातेची चिमुकल्यासह विहिरीत आत्महत्या
यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून पतीसोबत झालेल्या वादात क्षणिक रागातून एका मातेने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरानजीकच्या भोसा परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने समाजमन सुन्न झाले.
अर्चना शांताराम राऊत (३०) आणि निधी शांताराम राऊत (१) रा. महाजन ले-आऊट भोसा असे मृत माय-लेकीची नावे आहेत. शांताराम राऊत हा मोलमजूरी करून कुटुंबाचा गाडा ओढत होता. मात्र गेल्या महिनाभरापासून त्याच्या हाताला कामच नव्हते. त्यामुळे पत्नी अर्चना आणि शांताराममध्ये खटके उडत होते. घटनेच्या दिवशी याच कारणावरून वाद झाला. शांताराम पैशाची व्यवस्था करण्यासाठी घाटंजी येथील बहिणीकडे निघून गेला. दरम्यान सोमवारी रात्री तो घरी आला. मात्र पत्नी अर्चना आणि मुलगी निधी दिसली नाही. शेजाऱ्यांकडे चौकशी केली, रात्रभर शोध घेतला परंतु थांगपत्ता लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू झाली. त्यावेळेस कुणीतरी अर्चना मुलीला घेऊन एका शेतातील विहिरीकडे गेल्याचे सांगितले. त्यामुळे शांतारामने स्थानिक नागरिकांसह विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी मायलेकींचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले.
या घटनेची माहिती परिसरात होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. वडगाव रोड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करण्यात आला. तुर्तास या प्रकरणी अकस्मात घटनेची नोंद घेण्यात आली. शांतारामचा यापूर्वी २००७ मध्ये विवाह झाला होता. मात्र त्याचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्याने मुळची आकोट येथील अर्चनाशी विवाह केला. हे दोघे जण भोसा परिसरातील महाजन ले-आऊटमध्ये राहात होते. त्यांना एक मुलगी झाली.
गेल्या १८ नोव्हेंबर रोजी या दोघांनी मुलगी निधीचा वाढदिवस उत्साहात साजराही केला, तिचा हा पहिला वाढदिवसच क्षणिक रागातून मातेने घेतलेल्या निर्णयाने अखेरचा ठरला. क्षणिक रागातून घडलेल्या या घटनेने भोसा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. दरम्यान उत्तरीय तपासणीनंतर दोघींचेही मृतदेह शांताराम राऊत यांच्या सुपूर्द करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)