फायनान्सच्या तगाद्याने महिलेची विष घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: October 2, 2016 00:22 IST2016-10-02T00:22:16+5:302016-10-02T00:22:16+5:30
खासगी फायनान्स कंपनीचे कर्मचारी वारंवार घरी येऊन कर्जाच्या पैैशासाठी धमकावत असल्याने घाबरून गेलेल्या

फायनान्सच्या तगाद्याने महिलेची विष घेऊन आत्महत्या
दोन फायनान्सचे घेतले होते कर्ज : एकाच आठवड्यात मारेगाव तालुक्यात दुसरी घटना
मारेगाव : खासगी फायनान्स कंपनीचे कर्मचारी वारंवार घरी येऊन कर्जाच्या पैैशासाठी धमकावत असल्याने घाबरून गेलेल्या तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. फायनान्सच्या तगाद्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची एकाच आठवड्यात ही दुसरी घटना आहे.
मंगला दादाराव आस्वले (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात फायनान्स कंपन्याचे जाळे पसरले आहे. या कंपन्या गावागावात जावून महिलांची बचत गट बनवितात व चढ्या व्याजदराने कर्जाचे वाटप करतात. या कर्जासोबतच अनेक न खपणाऱ्या वस्तू कर्जदारांच्या माथी मारून कर्जाचा आकडा फुगविला जातो. कसलेही कागदपत्र न देता घरच्या घरी कर्ज मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिला या कंपनीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. अनेकांनी तर एकाच वेळी तीन ते चार कंपनीकडून कर्जाची उचल केली आहे. तालुक्यातील बोरी येथील मंगला आस्वले यांनीही वणी येथील एका फायनान्स कंपनीकडून ३५ हजार, तर वरोरा येथील एका कंपनीकडून २५ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. परंतु मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला गेल्या १५ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रोजगार मिळाला नव्हता. मजुरीचे पैैसे न मिळाल्यामुळे मंगला कर्जाचे पैैसे भरू शकली नाही. अशातच फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंगलाच्या घरी जावून तिला धमकावले. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मंगला धास्तावलेल्या अवस्थेत होती. अशातच शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घरातील मंडळी झोपून असताना मंगलाने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली, अशी माहिती तिचा दीर पिंटू आस्वले यांनी दिली. पोलिसांनी फायनान्स कंपनीचे कर्जाचे कागदपत्र जप्त केले. अधिक तपास ठाणेदार संजय शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश बोंडे करीत आहे. वृत्त लिहीस्तोवर कंपनीविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. (शहर प्रतिनिधी)