बियाणे व कर्जाच्या काळजीतून आत्मघात

By Admin | Updated: May 16, 2015 00:04 IST2015-05-16T00:04:22+5:302015-05-16T00:04:22+5:30

महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त कर्जबाजारी व उपासमारीला तोंड देत असलेल्या तणावग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ..

Suicide by the care of seeds and loans | बियाणे व कर्जाच्या काळजीतून आत्मघात

बियाणे व कर्जाच्या काळजीतून आत्मघात

‘विजस’ची माहिती : पश्चिम विदर्भात आणखी सहा कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या
यवतमाळ : महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त कर्जबाजारी व उपासमारीला तोंड देत असलेल्या तणावग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांना स्मार्ट सिटी व मेट्रो रेलचा विकास दाखविण्यासाठी मुख्यमंत्री जर्मनी, इस्राईलला गेले आहेत. आता चीनसाठी रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पश्चिम विदर्भात आणखी सहा कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बियाणे व नवीन कर्जाच्या काळजीमुळे या आत्महत्या होत असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
दोन-तीन दिवसात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये चार शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्हयात झाल्या आहेत. उल्लेखनिय म्हणजे प्रधान सचिव स्तराचा मंत्रालयातील अधिकारी मुक्कामात असताना या आत्महत्या झाल्याने सध्याच्या गंभीर परिस्थितीचा अनुभव आता सरकारला येत आहे. कारण ज्या सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजावाजा करून रात्री शेतकऱ्यांच्या घरी रात्री मुक्काम करून सकाळी जल शिवार कामाचे भूमिपूजन केलेल्या घोंडखेरी गावाचे आदिवासी शेतकरी जयराम पारधी यांचा समावेश आहे. त्यासोबत राजूरचे आदिवासी शेतकरी सूर्यभान पेंदाम, धानोराचे लक्ष्मन नेवारे तर ब्राह्मणवाडा येथील मोहनलाल राठोड यांच्या तर अमरावती जिल्यातील तळेगावचे मुकेश गोंडसे व अंजनगावसूर्जी येथील नरेंद्र नवले यांचा समावेश आहे. यावर्षी २०१५ मध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा विक्रमी ५५० च्यावर वर पोहचला असून सरकारी आकडेवारी सुद्धा आता अधिकृतपणे ४५० पेक्षा अधिक आहे. पश्चिम विदर्भात महाराष्ट्रात सर्वात जास्त ३३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली देत असून या सर्व शेतकऱ्यांना वेळेवर कर्जमाफी, सरकारी मदत, अन्न, आजारात मदत, मुलींच्या लग्नासाठी मदतीचा हात, खेड्यात हाताला काम, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चामध्ये सरकार व बँकांकडून मदत मिळाली असती तर या आत्महत्या टाळल्या गेल्या असत्या, असा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
विदर्भ व मराठवाड्याच्या कृषी संकटाच्या मुळात असलेले प्रमुख कारण म्हणजे शेतीमालाचा कमी भाव, सतत नापिकी व तोट्याच्या शेतीमुळे झालेल्या कर्जाच्या डोंगरावर उपाययोजना करण्यास सरकार तयार नसून, कृषिमंत्री ह्या शेतकऱ्यांची नैतिक शक्ती कमी झाली आहे व सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यास हतबल असल्याची कबुली देतात. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री दीपक सावंत शेतकऱ्यांचा मानसिक सर्वे सरकार करणार असून सेवक दारोदारी जाऊन आपल्या घरात कोणी वेडेपणा करीत आहे का, असा सवाल करणार आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी वेळोवेळी शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या, या मागण्यांची पूर्तता तर सोडाच त्यांचा विचारही शासनाकडून करण्यात आला नाही. या मागण्यांची पूर्तता वेळीच केली असती तर शेतकरी आत्महत्या यापूर्वीच थांबल्या असत्या, याकडेही विजसने लक्ष वेधले आहे.

Web Title: Suicide by the care of seeds and loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.