जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी सोईच्या सीईओचा शोध
By Admin | Updated: July 17, 2015 02:34 IST2015-07-17T02:34:07+5:302015-07-17T02:34:07+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आता नव्याने मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी सोईच्या अधिकाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी सोईच्या सीईओचा शोध
राज्य बँकेवर नजर : सात महिन्यांपासून प्रभारी
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आता नव्याने मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी सोईच्या अधिकाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या सात महिन्यांपासून पूर्ण वेळ सीईओ नाहीत. या बँकेचे मावळते सीईओ दोन महिन्यांपासून जामीन न मिळाल्याने कारागृहात आहे. प्रभारी सीईओंवर बँकेचा कारभार सुरू आहे. मात्र आता बँकेने आपल्या सोईने वागणाऱ्या जुन्या सीईओंसारखा नव्या सीईओंचा शोध सुरू केला आहे. वय वर्ष ५५ पेक्षा अधिक नको, पदवीधर, बँकींगचा दहा वर्षाचा अनुभव हे मूळ निकष असले तरी सीईओ म्हणून येणारा व्यक्ती संचालकांच्या दरबारात किती वाकणारा आहे, यावर त्याची खरी पात्रता ठरण्याची शक्यता आहे. पाहिजे तसे वागणारा, म्हणेल तेथे स्वाक्षरी करणाऱ्या सीईओंचा सध्या राज्य सहकारी बँकेत शोध घेतला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
२२ जुलैच्या सुनावणीकडे नजरा
९७ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्य सहकारी बँक, साखर कारखाने व सहकारातील विविध संस्थांमधील सात ते आठ याचिका नागपूर उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्या सर्व याचिकांवर २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लक्ष लागले आहे. कारण बँकेतील एका संचालकानेसुद्धा याचिका दाखल केली आहे. वर्षभरापासून त्या याचिकेवर सुनावणीच झाली नाही. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. २२ जुलैच्या सुनावणीत ही याचिका समाविष्ठ नसली तरी त्या दिवशी दिल्या जाणाऱ्या निर्णयाचा या संचालकाच्या याचिकेवर परिणाम होण्याची व त्यातून बँकेच्या निवडणुकांचा निश्चित कालावधी ठरण्याची शक्यता सहकार क्षेत्रात वर्तविली जात आहे.