वीज कंपनीच्या दुर्लक्षाने लाखोंचा ऊस खाक
By Admin | Updated: November 30, 2015 02:22 IST2015-11-30T02:12:50+5:302015-11-30T02:22:00+5:30
दारव्हा तालुक्यातील वरूड येथील निरंजन कुटे यांच्या शेतात विजेच्या तारांत घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने उसाला आग लागली.

वीज कंपनीच्या दुर्लक्षाने लाखोंचा ऊस खाक
ऊस खाक : दारव्हा तालुक्यातील वरूड येथील निरंजन कुटे यांच्या शेतात विजेच्या तारांत घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने उसाला आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण करीत शेतातील लाखो रुपयांचा ऊस भस्मसात केला. या शेतकऱ्याला भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
वरूड येथील घटना : लोंबकळणाऱ्या तारांच्या स्पार्किंगमुळे लागली आग
यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. एकीकडे कृषिपंपाला वीज पुरवठा नसल्याने पिके सुकत आहे. तर दुसरीकडे लोंबकळलेल्या वीज तारांमुळे हातातोंडाशी आलेला घासही हिरावल्या जात आहे. दारव्हा तालुक्यातील वरूड येथे
कृषिपंपाच्या लोंबकळलेल्या वीज तारांचे स्पार्किंग होऊन उसाला आग लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.
वरूड येथील निरंजन काशीनाथ कुटे या शेतकऱ्याने शेतात उसाची लागवड केली. मोठ्या मेहनतीने उसाचे पीक बहरले होते. शुक्रवारी सकाळी अचानक उसाला आग लागल्याचे आढळून आले. पाहता पाहता संपूर्ण ऊसच जळून खाक झाला. लोंबकाळलेली वीज तार तुटून पडल्यामुळे उसाला आग लागली. वीज कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच वीज कंपनीबाबत असलेला रोष या घटनेनंतर आणखी वाढला आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरून द्यावे, अशी मागणीही या शेतकऱ्याने केली आहे. एकंदरच वीज कंपनीच्या कारभाराबाबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोष आढळून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)