शेकडो हेक्टरवरील ऊस शेतातच उभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:00 IST2018-01-07T22:00:36+5:302018-01-07T22:00:52+5:30
वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकºयांवर येणार आहे.

शेकडो हेक्टरवरील ऊस शेतातच उभा
लोकमत न्यूज नेटवर्क
ढाणकी : वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. तर काही ठिकाणी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.
उमरखेड तालुक्याची कामधेनू असलेला साखर कारखाना यंदा बंद पडला आहे. संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. परिणामी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. सुरुवातीला वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होणार या आशेवर परिसरातील शेतकरी निर्धास्त होता. परंतु कारखाना अचानक बंद पडला. शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. आता जानेवारी उजाडला. परंतु ऊस जाण्याची चिन्हे नाही. गतवर्षीपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे फिरणारे कारखाने आता मात्र फिरकूनही पाहात नाही. आलेले कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. ऊसतोडणीसाठी बसविलेल्या टोळ्या शेतकऱ्यांकडून एकरी पाच हजार रुपयांची मागणी करतात.
या परिसरातील ऊस उत्पादकांच्या नोंदी वसंतला होत्या. त्यामुळे त्यांचा ऊस योग्य वेळेवर नेला जायचा. पंरतु आता त्यांचा ऊस तोडण्यासाठी कुणीही तयार नाही. परिणामी शेतकरी भांबावून गेला आहे. ऊस जर तोडला नाही तर शेतकºयांना तो जाळावा लागणार आहे. यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी आहे.
कारखाना सुरू होण्याची चिन्हे नाही
वसंत सहकारी साखर कारखाना गत काही वर्षांपासून आर्थिक डबघाईस आला होता. गतवर्षी निच्चांकी गाळप करून कारखान्याचा पट्टा पडला. यावर्षी तर कारखाना सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा कारखाना सत्ताधारी भाजपाने आपल्या ताब्यात घेतला. सहकार क्षेत्रातील दिग्गज कारखान्याच्या अध्यक्षस्थानी बसविले. परंतु मंत्रालयापर्यंत प्रयत्न करूनही हा कारखाना सुरू झाला नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांसोबतच कामगारांचेही हाल होत आहे.