‘त्या’ शेतकऱ्याचे मन वळविण्यात अखेर यश
By Admin | Updated: October 8, 2015 02:08 IST2015-10-08T02:08:15+5:302015-10-08T02:08:15+5:30
हाताला काम नाही, वडिलोपार्जित शेतही दुसऱ्याच्या नावावर अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या तालुक्यातील आरंभी येथील एका शेतकऱ्याचे मन वळविण्यात प्रशासनाला यश आले.

‘त्या’ शेतकऱ्याचे मन वळविण्यात अखेर यश
आत्महत्येची मागितली होती परवानगी : दिग्रस तहसीलदारांनी केले समुपदेशन
सुनील हिरास दिग्रस
हाताला काम नाही, वडिलोपार्जित शेतही दुसऱ्याच्या नावावर अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या तालुक्यातील आरंभी येथील एका शेतकऱ्याचे मन वळविण्यात प्रशासनाला यश आले. तहसीलदाराने सदर शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याचे समूपदेशन करीत आत्महत्येपासून परावृत्त केले.
आरंभी येथील शेतकरी पृथ्वीराज बिभिषण राठोड (३०) या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. याच शेतीवर तो पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई यांचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु या वडिलोपार्जित जमीन आजीच्या नावावर असून काका ती वाहत आहे. हीच जमीन पूर्वी त्याच्या वडिलांच्या नावे होती आणि ते वाहतही होते. आर्थिक व बिकट परिस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे २००५ मध्ये वडील बिभिषण राठोड यांनी आत्महत्या केली होती. घरगुती व्यवहारामध्ये ही जमीन अडकली आहे. त्यामुळे पृथ्वीराजकडे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी कोणतेही साधन नाही. हाताला काम नसल्याने मला कुटुंबासह आत्महत्या करू द्यावी, अशी विनंती त्याने जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे एका निवेदनातून केली होती.
त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत तहसीलदारांना निर्देश दिले. तत्काळ शेतकऱ्याची भेट घेऊन त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बुधवारी तहसीलदार नितीन देवरे आरंभी येथे पोहोचले. त्यांनी शेतकऱ्याच्या परिस्थितीचे अवलोकन केले. तसेच याही परिस्थितीतून मार्ग निघेल. आत्महत्येतून काही साध्य होणार नाही, असे मार्गदर्शन केले.
त्यामुळे पृथ्वीराजचे मतपरिवर्तन होऊन त्याने आता आपण आत्महत्या करणार नाही, अशी कबुली दिली. एवढेच नाही तर भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार मनात आणणार नाही, असे सांगितले. प्रशासनाने वेळीच दखल घेतल्याने आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला जीवदान मिळाले.