पालिका उपाध्यक्षपदी सुभाष राय अविरोध
By Admin | Updated: January 3, 2017 02:09 IST2017-01-03T02:09:08+5:302017-01-03T02:09:08+5:30
येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांची सोमवारी अविरोध निवड

पालिका उपाध्यक्षपदी सुभाष राय अविरोध
समर्थकांचा जल्लोष : स्वीकृत सदस्यांची घोषणा
यवतमाळ : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांची सोमवारी अविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी उपाध्यक्षासह पाच स्वीकृत सदस्यांच्या नावांचीही घोषणा केली.
यवतमाळ नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष निवडीसाठी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामांकन भरण्याची प्रक्रिया घेण्यात आली. यात भाजपाचे सुभाष राय यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे ३ वाजता झालेल्या सभेत नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी राय यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा केली. स्वीकृत सदस्यत्वासाठी आलेल्या अर्जांची छाननी करून ते अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांकडे पाठविले. पाच जागांसाठी १२ नामांकन शिल्लक होते. त्यापैकी भाजपाचे गटनेते विजय खडसे यांनी संदीप तातेड, रेखा कोठेकर, अजय राऊत यांचे नाव सूचविले. काँग्रेस गटनेत्याने दिनेश गोगरकर यांचे तर शिवसेना गटनेते गजानन इंगोले यांनी राजेंद्र गायकवाड यांचे नाव सूचविले. त्यानंतर पाचही जणांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी केले.
पाच नगरसेवकांचा प्रभाग
४शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रभाग १७ मध्ये सर्वाधिक नगरसेवक झाले आहेत. यात तीन स्वीकृत नगरसेवकांची भर पडली आहे. काँग्रेस व भाजपाचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला. आता स्वीकृत म्हणून भाजपाने दोन सदस्य तर शिवसेनेकडून एक सदस्य याच प्रभागातून दिले आहे.