Study the mantra of Vidya, Vinay, Viveka | विद्या, विनय, विवेकाचा मंत्र जपा
विद्या, विनय, विवेकाचा मंत्र जपा

ठळक मुद्देमुनिश्री आलोककुमारजी : खैरी येथे महावीर भवन, वीणादेवी दर्डा सभागृहाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जैन श्रावक संघाच्या वतीने खैरी येथे साकारण्यात आलेल्या महावीर भवनाचे व वीणादेवी जवाहरलाल दर्डा सभागृहाचे रविवारी थाटात लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुनिश्री आलोककुमारजी यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, मनुष्यजीवनाचा खरा विकास साधायचा असेल तर प्रत्येकाने तीन सद्गुणांच मंत्र जपला पाहिजे. विद्या, विनय आणि विवेक या तीन प्रेरणांचा विकास केला पाहिजे.
मुनिश्री आलोककुमारजी यांच्या नवकार महामंत्राने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासह मुनिश्री हिमकुमारजी आणि मुनिश्री लक्ष्यकुमारजी उपस्थित होते. आपण शाळांमधून जी विद्या शिकतो, ती सांसारिक विद्या आहे. तर दुसरी विद्या म्हणजे आत्मविद्या किंवा अध्यात्मिक विद्या होय. आज शिक्षणासोबतच हिंसा वाढत आहे. सांसारिक शिक्षणासोबतच तणाव वाढत आहे. कारण आत्मविद्येकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरी प्रेरणा म्हणजे विनय. भगवान महावीर यांच्या व्यवहारातून विनय झळकत होता. वृद्धाश्रम हा समाजाला अभिशाप आहे. जिवंतपणी ज्या आईवडिलांना पाणीही पाजले जात नाही, त्याच आईवडिलांना मृत्यूनंतर तुपाने मढवले जाते. हे समाजातील मोठे व्यंग आहे. कारण प्रत्येकाने विनयाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक जण विनयाने वागला तरच विकास होईल. तिसरी प्रेरणा म्हणजे विवेक. विवेक म्हणजे, अलग-अलग करणे. कोणते कार्य करणीय आणि कोणते अकरणीय, हे ओळखणे म्हणजे विवेक. चांगले काय वाईट काय याचे चिंतन करून त्यानुसार जगणे म्हणजे विवेकाने जगणे होय. माणसाला खरा विकास हवा असेल तर विद्या, विनय आणि विवेकाचे अनुसरण केले पाहिजे, असे मार्गदर्शन यावेळी मुनिश्री आलोककुमारजी यांनी केले. खैरी येथील भवनाचा धार्मिक, अध्यात्मिक कार्यासाठी सदुपयोग व्हाव, अशी अपेक्षा मुनिश्री आलोककुमारजी यांनी व्यक्त केली.
यावेळी हिंगणघाट येथील गायक विजय (बंटी) कोठारी व संचाने संगीतमय मंगलाचरण सादर केले. प्रियंका कोचर, संगीता कोचर, छाया झामड, अनिता झामड यांनी स्वागतगीत सादर केले. प्रस्ताविक जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश झामड यांनी केले. संचालन राजेंद्र कोठारी तर आभार भागचंद कोचर यांनी मानले.

अरबी समुद्रातील स्मारक आणि राजकारण
विजय दर्डा म्हणाले, नागपूरमध्ये पहिल्यांदा सकल जैन समाजाची स्थापना करण्यात आली, त्यावेळी पहिला अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. देशभरातील विविध पंथांचे मान्यवर त्यावेळी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते. हे परिवर्तन पाहून तत्कालीन पंतप्रधान नरसिम्हाराव खास या कार्यक्रमासाठी आले होते. महात्मा गांधींनी ज्या पद्धतीने जवळपास ४० देशांना आपल्या अहिंसेच्या विचारांनी वेगळी दिशा दिली, भगवान महावीरांचे ‘जियो और जिने दो’ हे विचारही जगाला दिशा देतात. त्यामुळे त्यांचे अरबी समुद्रात स्मारक बनविल्यास त्यांचा विचार संपूर्ण विश्वाला अहिंसेच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करेल, असा प्रस्ताव मी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापुढे बोलून दाखविला होता. त्यासाठी १०० कोटीचा निधी देण्यासही त्यांनी संमती दर्शविली होती. मात्र पुढे बहुमताच्या राजकारणामुळे ते स्मारक होऊ शकले नाही. स्थळ हे केवळ प्रतीक असते. जीवनविज्ञान हेच आपले जीवन सुंदर आणि सरल बनवू शकते. आपल्या संतांकडून आपल्याला संस्कार मिळतात. मात्र आपण आपल्या संतांचे विचार साहित्यरूपात आणले नाही. हे विचार साहित्यरूपात आणल्यास ते नव्या पिढीला कळतील. आज टीव्ही, सोशल मीडियामुळे नवीन पिढी भलत्याच दिशेला निघाली आहे. त्यामुळे संतांच्या विचारांची आदान-प्रदान झाली पाहिजे आणि त्या विचारांना साहित्यरूपी सुरक्षा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 

Web Title: Study the mantra of Vidya, Vinay, Viveka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.