चिऊसाठी विद्यार्थ्यांची धडपड

By Admin | Updated: May 9, 2015 00:05 IST2015-05-09T00:05:05+5:302015-05-09T00:05:05+5:30

बालवयात चिमणीचा चिवचिवाट ऐकणे किती तरी आनंददायी असते. हा घास चिऊचा, चिऊ ये खाऊ घे किंवा ...

Students' tussle for the tea | चिऊसाठी विद्यार्थ्यांची धडपड

चिऊसाठी विद्यार्थ्यांची धडपड

चारा-पाण्याची सोय : शाळेच्या प्रांगणातील झाडांना बांधले मडके
मारेगाव : बालवयात चिमणीचा चिवचिवाट ऐकणे किती तरी आनंददायी असते. हा घास चिऊचा, चिऊ ये खाऊ घे किंवा चिमणी-चिमणी पाणी दे, हे बोबडे बोल ऐकवितच बालपणी आई चिमुकल्यांना घास भरविते. मात्र तीच चिमणी आता दिसणेही दुरापास्त झाले आहे.
चिमण्यांविषयी असलेला जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा आणि चिमण्यांचे अस्तित्त्व टिकून राहावे, या हेतूने तालुक्यातील जळका येथील मोघे विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात त्यांच्या चारा-पाण्याची सोय केली आहे. नववीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. नववीच्या विद्यार्थ्यांना आता दहावीचा अभ्यासक्रम शिकविणे सुरू आहे. दहावीला प्रथम भाषा मराठी या पाठ्यपुस्तकात राजन गवस यांचा ‘चिमण्या’ नामक धडा आहे. हा धडा शिकत असताना पाठ्यक्रम जीवनाशी जोडण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. दुष्काळी परिस्थिती, डोंगराळ भाग त्यात कडक उन्हाळ्यात चारा-पाण्याविना चिमण्या व इतर पक्षांची होणारी अवहेलना बघितली आणि चिमण्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात टाकाऊ असलेले मातीचे भांडे, प्लॉस्टीकचे डबे, धान्य शाळेत आतून शाळेच्या पटांगणात असलेल्या झाडांना दोरीच्या सहाय्याने भांडे-मडके बांधले. त्या भांड्यात पाणी, धान्य टाकून चिमण्यांच्या चारा-पाण्याची सोय केली. सोबतच जमिनीत चार बाय दहा फुटाचा खड्डा खोदून त्यात प्लॉस्टीक टाकून जलकुंड तयार केले. त्यामुळे कोरड्या वाळवंटात चिमण्यांच्या पाण्याची सोय झाली. संपूर्ण उन्हाळभर या भांड्यात चारा-पाणी टाकण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांनी घेतली. दररोज चार विद्यार्थी शाळेत येऊन उन्हाळभर या भांड्यात चारा-पाणी टाकणार आहे. यासोबत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या अंगणात पक्षांसाठी पाणी, धान्याची सोय करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रगत युगात मनुष्य भौतिक सुखाच्या दिशेने धावत असताना पशु-पक्षांना विसरत चालला आहे. त्याची प्राणी मात्रावरील दया कमी होत आहे. मुके जीव कडक उन्हाळ्यात पाण्याच्या थेंबासाठी तडफडत असतात. या विद्यार्थ्यांनी घालून दिलेला हा आदर्श येणाऱ्या पिढीसाठी शुभ वर्तमान, तर इतर शाळांसाठी प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे. (शहर प्रतिनिधी)

कर्मचाऱ्यांचेही लाभले विद्यार्थ्यांना सहकार्य
उन्हाळ्यात पक्षाच्या चारा-पाण्याचे नियोजन करण्याविषयी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका अरूणा राऊत, हरित सेनेचे शिक्षक डी.बी.गवळी, छात्रसेना शिक्षक व्ही.के.राऊत, एस.एन.नहाते, शाळा व्यवस्थापक अतुल मोघे यांनी मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील आसेकर, प्रमोद नहाते, रंजीत भगत यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Students' tussle for the tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.