देशाला महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे
By Admin | Updated: January 27, 2015 23:39 IST2015-01-27T23:39:56+5:302015-01-27T23:39:56+5:30
जगात भारताची ओळख तरुणांचा देश म्हणून आहे. आपल्या देशातील तरुणांच्या कौशल्याची संपूर्ण जगात मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतातील तरुण अतुलनीय कार्य करीत आहेत.

देशाला महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे
यवतमाळ : जगात भारताची ओळख तरुणांचा देश म्हणून आहे. आपल्या देशातील तरुणांच्या कौशल्याची संपूर्ण जगात मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतातील तरुण अतुलनीय कार्य करीत आहेत. देशाच्या विकासात तरुणांनी योगदान दिले तर आम्ही आणखी वेगाने विकासात पुढे जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी या दिशेने प्रयत्न करून गाव, शहर, राज्य आणि देशाचा विकास करण्यासाठी पुढे येऊन देशाला महासत्ता बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी येथे केले.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘युफोरिया-१५’ या स्नेहसंमेलनात उद्घाटक म्हणून ना. राठोड बोलत होते. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.जी.आर. बमनोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, कार्यक्रमाचे समन्वयक विभागप्रमुख प्रा. पंकज एम. पंडित उपस्थित होते.
ना.संजय राठोड म्हणाले, यवतमाळच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या विकासात जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे विकासातील योगदान कुणालाही विसरणे शक्य नाही. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय तज्ज्ञांची नवी पिढी घडवित असून हे काम अखंडपणे महाविद्यालय करीत आहे. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना अशा स्नेहसंमेलनातून ऊर्जा मिळते. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे. यापूर्वीच्या सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. या संकटाच्या वेळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.
पालकमंत्र्यांनी तरुणांना खास करून विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्लाही यावेळी दिला. (नगर प्रतिनिधी)