‘एज्युफेस्ट’ला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
By Admin | Updated: January 16, 2017 01:01 IST2017-01-16T01:01:51+5:302017-01-16T01:01:51+5:30
रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाउन तर्फे आयोजित ‘एज्युफेस्ट’चे उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

‘एज्युफेस्ट’ला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
माहितीपूर्ण सेमिनार : ‘रोड नॉट टेकन’ शोला सर्वाधिक पसंती
यवतमाळ : रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाउन तर्फे आयोजित ‘एज्युफेस्ट’चे उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. पहिल्या दोन दिवसातील माहितीपूर्ण कार्यक्रमांना विद्यार्थी व नागरिकांचा प्रतिसाद लाभला असून सोमवारी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शनिवारी पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, हिराचंद रतनचंद मुणोत ट्रस्टचे सचिव रमेश मुणोत, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रवी सावंत, डॉ. हिरूरकर आदींच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत अजेय गंपावार यांनी घेतली. या कार्यक्रमाला महिला व विद्यार्थिनींची मोठी उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी श्याम मस्के यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘रोड नॉट टेकन’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. वेगळी वाट शोधून यशस्वी झालेल्या व्यक्तींसोबत संवाद साधण्यात आला. यात विवेक रानडे, अतुल धामनकर, अतुल जोशी यांची मुलाखत अजेय गंपावार यांनी घेतली.
रविवारी झालेल्या कार्यक्रमात ओ. एस. बिहाडे यांनी इंजिनिअरिंग करिअर्स याबाबत मार्गदर्शन केले. तर शिवाली देशपांडे यांचे ‘करिअर्स आर्मी’ विषयावर भाषण झाले. मंगळवारी १६ जानेवारीला ‘फॉरेन एज्युकेशन’ आणि ‘करिअर्स इन मेडिकल फिल्ड’ या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मुकुल चिमोटे (पुणे) हे दुपारी १ वाजता मार्गदर्शन करणार आहेत. केवळ श्रीमंतांचीचे मुले विदेशात शिकू शकतात असे नाही. तर केवळ ५० हजार रुपयांतही परदेशात शिक्षण घेणे शक्य होऊ शकते, अशा मुद्द्यांवर ते प्रकाश टाकणार आहेत. ‘करिअर्स इन एअरफोर्स’ यावर विग कमांडर प्रियदर्शन अय्यर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शेफ विष्णू मनोहर हे ‘करिअर्स अँड हॉटेल इंडस्ट्रिज’ या विषयावर सेमिनार घेणार आहेत. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल फॉर सक्सेसफुल करिअर या विषयावर संजय रघटाटे यांचा सेमिनार होईल.
सायंकाळी ५ वाजता ‘एज्युफेस्ट’चा समारोप होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाउनतर्फे अध्यक्ष विजय शेटे, सचिव अजय भूत, दिलीप हिंडोचा, प्रकल्प सल्लागार जगजितसिंग ओबेराय, प्रकल्प समन्वयक जयप्रकाश जाजू, अमित मोर, विक्रमसिंग दालवाला, जाफरसादीक गिलाणी आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)