विद्यार्थ्यांनी वसतिगृहात गृहपालास कोंडले
By Admin | Updated: December 13, 2014 02:28 IST2014-12-13T02:28:00+5:302014-12-13T02:28:00+5:30
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देण्यात आलेल्या भोजन कंत्राटदारास हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क गृहपालास कोंडल्याची घटना ...

विद्यार्थ्यांनी वसतिगृहात गृहपालास कोंडले
पुसद : विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देण्यात आलेल्या भोजन कंत्राटदारास हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क गृहपालास कोंडल्याची घटना शुक्रवारी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात घडली.
या वसतिगृहात अनधिकृत भोजन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून विद्यार्थी मनमानी करीत यंत्रणेला वेठीस धरीत असल्याचा आरोप आदिवासी विकास कार्यालयाकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे येथील कर्मचारीवर्गात तीव्र असंतोष धुमसत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येथील शनि मंदिराजवळ शासकीय आदिवासी वसतिगृह चालविण्यात येते. या वसतिगृहात ७५ विद्यार्थ्यांची क्षमता असून सध्या येथे १०१ विद्यार्थी प्रवेशित आहे. तसेच येथे दररोज ४० ते ५० विद्यार्थी अनधिकृत भोजन घेत असल्याची धक्कादायक माहिती आहे. या बाहेरच्या विद्यार्थ्यांना भोजन देण्यास नकार दिल्यावर येथील विद्यार्थी भोजन ठेकेदारास वेठीस धरतात. यातून गृहपालास कोंडून ठेवणे, स्वयंपाकगृहाला कुलूप ठोकणे, खोट्या तक्रारी करणे आदी प्रकार नित्याचेच झाल्याचे सांगण्यात आले. यातूनच गृहपाल शेख मोहमद यांना दुपारी कोंडण्यात आले.
वरिष्ठांनी सदर घटनेला गांभीर्याने घेवून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे. या बाबत प्रकल्प अधिकारी उल्हास सकवान यांच्याशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे वेगळा चेहरा असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी प्रत्येक महिन्याला भोजन ठेकेदार बदलण्याची मागणी करीत असून ठेकेदाराची नियुक्ती ई-निविदेद्वारे आयुक्त अमरावती यांच्यामार्फत होते. विद्यार्थ्यांनी या पूर्वीही खोडके नामक गृहपालास विनाकारण कोंडले होते. हे प्रकार थांबविण्यासाठी वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सकवान म्हणाले. (प्रतिनिधी)