विद्यार्थिनीच्या खुनातील आरोपीस अखेर अटक
By Admin | Updated: September 26, 2015 02:28 IST2015-09-26T02:28:27+5:302015-09-26T02:28:27+5:30
एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला वडगाव रोड पोलिसांनी नागपूरच्या शासकीय रुग्णालयातून गुरूवारी रात्री ताब्यात घेतले.

विद्यार्थिनीच्या खुनातील आरोपीस अखेर अटक
एकतर्फी प्रेमप्रकरण : नागपूर रुग्णालयातून घेतले ताब्यात
यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला वडगाव रोड पोलिसांनी नागपूरच्या शासकीय रुग्णालयातून गुरूवारी रात्री ताब्यात घेतले. आरोपीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान यवतमाळ पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता आरोपीला १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
शहरालगतच्या लोहार येथील देवीनगरातील विद्यार्थिनी सोनालीवर शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी दत्तात्रय नगरात आरोपी ओमप्रकाश गुजवार रा. गोन्ही ता. काटोल, जि. नागपूर याने एकतर्फी प्रेमातून चाकुने भोसकून खून केला होता. तेव्हापासून तो पसार होता. पोलिसांनी मध्यप्रदेशसह नागपूर जिल्हा पिंजून काढला. मात्र आरोपीचा थांगपत्ता लागला नाही. त्याचा शोध वडगाव रोड ठाण्याचे शोध पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सारंग मिरासे यांच्या नेतृत्वात विकास खडसे, गजानन धात्रक, बबलु चव्हाण, अरविंद चौधरी, गंगाधर घोडाम घेत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी आरोपीची नाकेबंदी केली. आरोपीचा नातेवाईकांकडे जाण्याचा मार्गच बंद झाल्याने त्याने सोमवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी घरी विष प्राशन केले. त्याला काटोल व त्यानंतर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. आरोपी ओमप्रकाशच्या प्रकृतीत सुधारणा होताच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरेलला चाकू, दुचाकी पोलिसांना जप्त करायची आहे.
आरोपी ओमप्रकाश हा दहा महिने लोहारा परिसरात वास्तव्याला होता. येथील खासगी कंपनीत तो सायडर म्हणून काम करीत होता. दोन महिन्यापूर्वी नोकरी सोडून तो कळमेश्वर जि.नागपूर येथे एका सूत गिरणीत कामाला लागला होता. घटनेच्या एक दिवस आधी तो यवतमाळात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर खुनासह अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)